मुंबई-पुणे महामार्गावरील फूड प्लाझामध्ये असलेल्या गुडलक कॅफेवर पुन्हा एकदा गंभीर आरोप लागले आहेत. गेल्या काही दिवसांपुर्वी पुण्यातील फर्ग्युसन रस्त्यावरील प्रसिद्ध गुडलक कॅफेमध्ये बन मस्कामध्ये काच आढळल्याने हा कॅफे अडचणीत सापडला होता. त्यानंतर आता या कॅफेमध्ये अंडाभुर्जीच्या ताटात झुरळ आढळल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.
या प्रकारामुळे ग्राहकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. यावरून सोशल मीडियावर देखील संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत. दरम्यान, काही दिवसांपूर्वी फर्ग्युसन रस्त्यावरील गुडलक कॅफेमध्ये बन मस्कामध्ये काच आढळून आल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला होता. याची गंभीर दखल घेत अन्न व औषध प्रशासन विभागाने संबंधित शाखेचा परवाना तात्पुरता रद्द केला होता.
तर स्वच्छतेसंदर्भात काही त्रुटी दूर करण्याचे आदेश देण्यात आले होते. मात्र हे प्रकरण सुरू असतानाच आता पुन्हा एकदा दुसऱ्या शाखेत असाच प्रकार घडला असल्याने खळबळ उडाली आहे.
दोन वेगवेगळ्या शाखांमध्ये सलग अशा घटना घडल्यामुळे अन्न सुरक्षेबाबत गुडलक कॅफेची गंभीर दुर्लक्ष होत असल्याचा आरोप तज्ज्ञांकडून करण्यात येत असून घटनेनंतर फूड प्लाझामधील शाखेचीही चौकशी करण्यात यावी, अशी मागणी ग्राहकांकडून होत आहे.
दरम्यान, गुडलक कॅफेच्या व्यवस्थापनाकडून या प्रकरणावर अद्याप कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही.