सिडको : अन्न व औषध प्रशासन विभागाच्या वतीने सातत्याने सणाच्या पार्श्वभूमी वर कारवाई सुरूच आहे. सिडको परिसरामध्ये धडक मोहीम राबवून 397 किलो पनीर हे खाण्यासाठी योग्य नसल्याने नष्ट केले आहे. या प्रकरणी दोन पेढ्यांवर धाड टाकल्याची माहिती विभागाच्या सूत्रांनी दिली आहे. सणासुदीतील दिवसांच्या पार्श्वभूमीवर धडक मोहिम सुरुच आहे. लागोपाठ होत असलेल्या कारवाईमुळे भेसळ करणाऱ्या माफियांमध्ये चांगलीच खळबळ उडाली आहे.
जनतेस सणासुदीच्या दिवसात दर्जेदार पदार्थ उपलब्ध व्हावेत याचाच भाग म्हणून अन्न औषध प्रशासनाचे पथक सकाळी 6.30 वाजेपासून कार्यालयास प्राप्त गुप्त माहितीच्या आधारावर दुर्गा मंदिरच्या मार्गे, त्रिमुर्ती चौक, सिडको मे. विराज एंटरप्रायजेस या पेढीची तपासणी करुन तेथून पनीरमध्ये खाद्य तेलाच्या भेसळीच्या संशयावरुन पनीरचे अन्न नमुना घेवून उर्वरित सुमारे 74 किलो, किंमत सुमारे16 हजार 280 रुपये किंमतीचा साठा जप्त करण्यात येवून जनहिताच्या दृष्टिने नष्ट करण्यात आला आहे.
तसेच काल अन्न औषध प्रशासनाचे पथक सकाळी 7.30 वाजेपासून कार्यालयास प्राप्त गुप्त माहितीच्या अनुषंगाने साईग्राम कॉलनी, उपेंद्रनगर पाण्याच्या टाकीजवळ, अंबड येथील साई एंटरप्रायजेस, या पेढीची तपासणी करून तेथून पनीरमध्ये खाद्य तेलाच्या भेसळीच्या संशयावरुन पनीरचे अन्न नमुना घेवून उर्वरित सुमारे 323 किलो, किंमत रु.67 हजार 830 रुपये किंमतीचा साठा जप्त करण्यात येवून नष्ट करण्यात आला आहे.
सदरचे दोन्ही पनीर हे अन्न नमुने विश्लेषणासाठी अन्न विश्लेषक यांचेकडे पाठविण्यात येत असून विश्लेषण अहवाल प्राप्त होताच विश्लेषण अहवालाच्या अनुषंगे अन्न सुरक्षा मानके कायद्या अंतर्गत पुढील आवश्यक कारवाई करण्यात येणार आहे. ही कारवाई, सहायक आयुक्त (अन्न) म.मो. सानप व वि.पां. धवड यांच्या नेतृत्वाखाली अन्न सुरक्षा अधिकारी पी. एस. पाटील, अविनाश दाभाडे, अन्न सुरक्षा अधिकारी (गुप्तवार्ता), नि.खं. साबळे यांच्या पथकाने नासिक विभागाचे सह आयुक्त सं.भा. नारगुडे यांच्या मार्गदर्शनाखाली केली आहे.
अन्न व औषध प्रशासनातर्फे सणासुदीच्या काळात आवाहन करण्यात येते की, नागरीकांनी दुधापासून तयार झालेली मिठाई खरेदी करतांना खरोखर त्यामध्ये दुध, खवा, मलई किंवा इतर दुग्धजन्य पदार्थापासून तयार केलेले आहेत याची खात्री करुनच खरेदी करावे त्याचप्रमाणे सर्व मिठाई विक्रेत्यांनी दुधापासूनच बनविलेल्या मिठाईची विक्री करावी.
दुधापासून न बनविलेल्या मिठाई विक्रीसाठी ठेवल्यास त्याबाबत स्पष्ट फलक दुकानात लावण्याचे आवाहन करण्यात येत आहे. तसेच हॉटेल व्यावसायिकांस आवाहन करण्यात येते की, त्यांनी भेसळयुक्त पनीरचा वापर अन्नपदार्थ बनविणे कामी करु नये, अन्यथा त्यांच्यावरही कारवाई करण्यात येईल.