नाशिक :- गुजरात राज्यातुन आणलेल्या रिच स्वीट डीलाइट एनलॉग या नावाने उत्पादीत केलेल्या अन्न पदार्थाच्या माध्यमातून मलई पेढा तयार करणाऱ्या दुकानावर अन्न व औषध प्रशासन विभागाने छापा टाकून कारवाई केली आहे. यात्रेच्या दिवशी ही कारवाई केल्यामुळे त्र्यंबकेश्वर येथील व्यापाऱ्यांमध्ये चांगलीच खळबळ उडाली आहे.
अन्न व औषध प्रशासनाने तिसऱ्या श्रावणी सोमवार प्रसंगी भाविकांची होणारी गर्दी लक्षात घेतात त्यांना दर्जेदार अन्न पदार्थ मिळण्याच्या दृष्टीने त्र्यंबकेश्वर येथे मोहीम सुरू केलेली आहे. त्याचाच भाग म्हणून त्र्यंबकेश्वर येथे भीमाशंकर पेढा सेंटर या आस्थापनेवर धाड टाकली.
त्या ठिकाणी गुजरात राज्यात रिच स्वीट डीलाइट एनलॉग या नावाने उत्पादीत केलेल्या अन्न पदार्थाच्या प्रत्येकी 10 किलोच्या आठ बॅग्स आढळून आल्या. या अन्न पदार्थाचा उपयोग करून विक्रेता गोसावी पेढा हा अन्नपदार्थ तयार करून त्याची मलाई पेढा नावाने विक्री करत असल्याचे आढळले.
सदर मलई पेढ्यामध्ये तसेच रिच स्वीट डिलाईट या अन्नपदार्थात कुठल्याही प्रकारची दुधापासून तयार झालेली मलई नसल्याने अन्नसुरक्षा अधिकारी कासार यांनी रीच स्वीट डिलाईट या अन्नपदार्थाचा साठा जप्त केला आणि पुढील आदेश प्राप्त होई पर्यंत साठा सुरक्षित ठेवण्याचे निर्देश दिले. तसेच विक्रीसाठी तयार केलेल्या मलई पेढ्याचा नमुना घेऊन पेढे नाशवंत असल्यामुळे घटनास्थळी साठा नष्ट केला.
जप्त केलेल्या रिच स्वीट डिलाईट अन्नपदार्थाच्या आठ बॅग तसेच नष्ट केलेला आठ किलो मलई पेढा असा एकूण 17240 रूपये किमतीचा साठा जप्त केला. सदर अन्न व्यवसायिकाकडे अन्न व्यवसाय करण्यासाठी आवश्यक अन्नसुरक्षा मानके कायद्यांतर्गत आवश्यक असलेला अन्न परवाना देखील उपलब्ध नसल्याचे आढळून आले. याप्रकरणी पुढील कारवाई अन्नसुरक्षा अधिकारी गोपाल कासार हे करीत आहेत.
सदरची कार्यवाही ही अन्न सुरक्षा अधिकारी गोपाल कासार व प्रमोद पाटील यांनी प्रशासनाचे सह आयुक्त नाशिक विभाग संजय नारागुडे व सहाय्यक आयुक्त अन्न विवेक पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली केली.