नाशिक (प्रतिनिधी) :- येथील अन्न व औषध प्रशासनाने पेढे आणि खवा विक्रेत्यांपाठोपाठ आता भेसळीचे दूध निर्मात्यांकडे लक्ष वळविले आहे.
निफाड तालुक्यातील बोकडदरे शिवारात गाईच्या दुधात भेसळ सुरू असताना नाशिक ग्रामीण पोलिसांच्या संयुक्त पथकाने छापा टाकून 48 हजार रुपये किमतीचे भेसळयुक्त गाईचे दूध नष्ट केले आहे, तसेच भेसळीचे दूध बनविण्यासाठी वापरण्यात येणारे बनावट तेल व इतर पदार्थही जप्त केले असून, दूध नष्ट करण्यात आले आहे. त्याचप्रमाणे भेसळयुक्त दूध बनविणारा व त्यासाठी विविध साहित्य पुरविणार्या पुरवठादारांवर देखील गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
मंगळवारी सकाळी 6.30 वाजेच्या सुमारास नाशिक विभाग अन्न व औषध प्रशासनाने नाशिक ग्रामीण पोलिसांच्या विशेष पथकासह संयुक्तरीत्या मिळालेल्या गोपनीय माहितीच्या अनुषंगाने निफाड तालुक्यातील, बोकडदरे शिवार, स्मशानभूमी जवळ, कातकाडे मळा, गट नंबर -31/1/ब/2, येथील अतुल वसंतराव कातकाडे यांच्या घरावर छापा टाकून तपासणी केली.
या ठिकाणी एक व्यक्ती दुधाच्या प्लास्टिक कॅनमध्ये काही पदार्थ मिसळत असल्याचे आढळून आले. या संयुक्त पथकाने पंचासमक्ष या परिसराची झाडाझडती घेतली असता या ठिकाणी डेअरी परमिट पावडर 18 किलो, होल मिल्क पावडर 34 किलो, तेलसदृश पदार्थ 170 लिटर व वरील पदार्थांची भेसळ करून बनविलेले 420 लिटर गायीच्या दुधाचा साठा विक्रीसाठी तयार केल्याचे आढळून आले.
या सर्व साठ्यातून अन्न सुरक्षा व मानके कायद्यांतर्गत अन्न सुरक्षा अधिकारी उमेश सूर्यवंशी यांनी अन्न नमुने विश्लेषणासाठी घेऊन दूध व सर्व पदार्थांचा उर्वरित साठा नष्ट केला. त्यात डेअरी परमिट पावडर 16 किलो (किंमत 2240 रुपये), होल मिल्क पावडर 32 किलो (किंमत 7680 रुपये), तेलसदृश पदार्थ 168 लिटर (किंमत 25 हजार 704 रुपये) व भेसळयुक्त गायीचे दूध 418 लिटर (किंमत 12 हजार 540 रुपये) असा एकूण 48 हजार 164 रुपये किमतीचा साठा जप्त केला.
तसेच भेसळयुक्त गाईचे दूध हे भेसळयुक्त व नाशवंत असल्याने जागेवरच नष्ट करण्यात आले. या भेसळयुक्त पदार्थांपैकी दूध पावडरचे पुरवठादार हेमंत पवार (रा. शहा, पंचाळे, ता. सिन्नर) व तेलसदृश पदार्थ सिन्नर माळेगाव येथील मोहन आरोटे यांच्याविरुद्ध अन्न सुरक्षा मानके कायद्याचे 26 (1), 26 (2) (ख) शिक्षा पात्र कलम 59 व भा. दं. वि. 272, 273 व 328 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही कारवाई अन्न सुरक्षा अधिकारी उमेश सूर्यवंशी व योगेश देशमुख यांनी विभागाचे सहआयुक्त सं. भा. नारगुडे व सहाय्यक आयुक्त उदय लोहोकरे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पाडली. या कारवाईत विशेष पथक, नाशिक ग्रामीण व निफाड पोलीस ठाण्याचे पथकाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.