नाशिक :- अन्न व औषध प्रशासनाने प्रतिबंधित अन्न पदार्थ विक्री बाबत कठोर धोरण स्वीकारले आहे. त्याचाच एक भाग म्हणून शहरात दोन ठिकाणी टाकलेल्या छाप्यात भेसळीच्या संशयावरून एकूण रूपये 59 हजार 450 रूपयांचा 224 किलोग्रॅमचा पनीर व मिठाईचा साठा जप्त करून नष्ट करण्यात आल्याची माहिती अन्न व औषध प्रशासनाचे सह आयुक्त (अन्न) संजय नारागुडे यांनी दिली आहे.
अन्न व औषध प्रशासनास शहरात बनावट पनीर व भेसळयुक्त पनीर विक्री होत असल्याची गुप्त माहिती मिळाली. त्यानुसार मे. जसपालसिंग प्रीतीपालसिंग कोहली, आनंद रोड, बळवंत प्लाझा जवळ, देवळाली कॅम्प, नाशिक यांच्या पेढीची तपासणी केली असता अस्वच्छ वातावरणात पनीरचा साठा साठविल्याचे निदर्शनास आले. तसेच सदर पेढी विनापरवाना पनीर उत्पादन करीत असल्याचे आढळले. पनीर भेसळीच्या संशयावरून अन्न नमुना विश्लेषणासाठी घेवून उर्वरित रूपये 37 हजार 730 किंमतीचा 171.5 किलोग्रॅम पनीरचा साठा जप्त करण्यात आला.
त्याचप्रमाणे मे. प्रशांत कोंडीराम यादव, आनंद रोड, बलवंत प्लाझा जवळ, देवळाली कॅम्प, नाशिक या स्वीट उत्पादक पेढीचीही तपासणी केली असता या पेढीत विनापरवाना अत्यंत अस्वच्छ वातावरणात पेढा, अंजीर बर्फी इत्यादी मिठाईचा साठा साठविल्याचे आढळले आहे. भेसळीच्या संशयावरून या पेढीतील अन्न नमुना विश्लेषणासाठी घेवून उर्वरित रूपये 21 हजार 720 किंमतीचा 53 किलोग्रॅमचा साठा जप्त करण्यात आला.
जप्त करण्यात आलेला एकूण 59 हजार 450 रूपयांचा 224 किलोग्रॅमचा साठा हा नाशवंत असल्याने जनआरोग्याच्या दृष्टीने जागेवर नष्ट करण्यात आला आहे.सदर मोहिमेत एकूण 3 अन्न नमुने विश्लेषनासाठी घेण्यात आले असून विश्लेषण अहवाल प्राप्त होताच अन्न सुरक्षा मानके कायदा 2006 अन्वये पुढील कारवाई करण्यात येणार आहे.
ही कार्यवाही अन्न सुरक्षा अधिकारी योगेश देशमुख, उमेश सुर्यवंशी आणि सहाय्यक आयुक्त (अन्न) उ.सि. लोहकरे यांनी सह आयुक्त (अन्न) संजय नारागुडे यांच्या मार्गदर्शनाखाली केली. अन्न व्यावसायिकांनी अन्न पदार्थात भेसळ करू नये. तसे करतांना आढळल्यास संबंधितांवर कडक कारवाई करण्यात येणार असल्याचा इशारा देण्यात आला आहे.
अन्न व औषध दर्जा बाबतीत संशय असल्यास नागरिकांनी प्रशासनाच्या टोल फ्री क्रमांक 1800222365 वर संपर्क साधावा. असे आवाहन अन्न व औषध प्रशासनाचे सह आयुक्त (अन्न) संजय नारागुडे यांनी केले आहे.