नाशिक (भ्रमर प्रतिनिधी :-नाशिक महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाने अशोक स्तंभ परिसरातील घारपुरे घाट येथील आव्हाड मॅटर्निटी व नागजी येथील फॉर्च्युन रुग्णालयांवर कारवाई केली असून दोन्ही रुग्णालयांनी महाराष्ट्र शुुश्रूूषा अधिनियम 1849 कायद्याचे उल्लंघन केल्याप्रकरणी रुग्णालय बंदचे आदेश रुग्णालयांना अंतिम नोटिशीद्वारे दिले आहे.
नाशिक महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाकडून शहरातील अनधिकृत रुग्णालयांसह विनापरवानगी रुग्णालयांची तपासणी सुरू आहे. दरम्यान, दोन्ही रुग्णालयांवर विनापरवानगीचा ठपका ठेवण्यात आला आहे. यातील घारपुरे घाट येथील आव्हाड मॅटर्निटी रुग्णालयाला फक्त एक मजल्याची परवानगी होती. पण या रुग्णालयाने 2023 पासून तीन मजल्यांवर बस्तान टाकून रुग्णालय सुरु ठेवले होते.
याप्रकरणी मनपाने रुग्णालयास तीनदा नोटीस बजावून त्यांचे म्हणणे मांडण्यास सांगितले होते. पण त्यांच्याकडून समाधानकारक उत्तर येऊ शकले नाही. याशिवाय मनपात याप्रकरणी सुनावणीही घेण्यात आली असता, आरोग्य विभागाचे समाधान होऊ न शकल्याने महापालिकेने त्यांना रुग्णालय बंदचे आदेश दिले आहेत.
दुसरे प्रकरण नागजी येथील फॉर्च्युन रुग्णालयाचे आहे. या रुग्णालयाने नाशिक महापालिकेकडे रुग्णालयाची नोंदच केलेली नाही. 2023 पासून या रुग्णालयाचे काम विनापरवानगी सुरू होते. काही दिवसांपूर्वी मनपा आरोग्य पथकाने या रुग्णालयात जाऊन कागदपत्रांची तपासणी केली असता, त्यांच्याकडे परवानगीची कागदपत्रेच नसल्याचे निदर्शनास आले. या रुग्णालयासही त्यांची बाजू मांडण्याची संधी दिली असता, त्यांच्याकडून समाधानकारक उत्तर न मिळाल्याने फॉर्च्युन रुग्णालय बंदचे आदेश दिले आहेत.
आव्हाड मॅटर्निटी व फोर्च्युन रुग्णालयास तीनदा नोटीस देऊनही त्यांनी समाधानकारक उत्तर न दिल्याने त्यांना तत्काळ रुग्णालय बंदचे आदेश दिले आहेत. त्यामुळे कोणीही महापालिकेची फसवणूक करू नये. शहरात खासगी रुग्णालयांची तपासणी सुरू आहे. त्यामुळे प्रशासनाला कोणीही फसवण्याचा प्रयत्न न करता शासनाने दिलेल्या अटी-शर्तीसह नाशिक महानगरपालिकेकडे रुग्णालयाची नोंद करावी, असे न करणार्या रुग्णालयांच्या विरोधात कारवाई केली जाईल, अशी माहिती मनपा मुख्य आरोग्य अधिकारी विजय देवकर यांनी दिली.