द्वारका वरील कराड बंधू चिवडा व भेळ भत्ता दुकानावर हल्ला करणारे आरोपी ताब्यात
द्वारका वरील कराड बंधू चिवडा व भेळ भत्ता दुकानावर हल्ला करणारे आरोपी ताब्यात
img
दैनिक भ्रमर



द्वारकावरील कराड बंधू भेळ भत्ता या दुकानावर कोयत्याने हल्ला करून दहशत माजविणाऱ्या गुन्हेगाराला गुंडाविरोधी पथकाने ताब्यात घेतले आहे. त्याच्यासोबत दोन विधी संघर्षित बालकांना देखील पोलिसांनी गुन्हा घडल्यापासून काही तासात ताब्यात घेतले. 



29 ऑक्टोबर रोजी सायंकाळी आठ वाजेच्या सुमारास द्वारका परिसरातील खरबंदा पार्क येथील कराड बंधू चिवडा व भेळभत्ता या ठिकाणी तोंडावर मास्क लावलेल्या अनोळखी मुलांनी जीवे मारण्याच्या उद्देशाने दुकानाच्या दिशेने विटा फेकून तसेच हातामध्ये धारदार कोयता घेऊन दुकानाच्या दिशेने कोयता फिरवून काउंटर वर दोन वेळा वार केला.

कराड बंधू चिवडा शेजारी असलेल्या उत्तम पेढा सेंटर दुकानाच्या काउंटरची देखील त्यांनी काच फोडून नुकसान केले. या प्रकरणी मुंबई नाका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

या गंभीर स्वरूपाच्या गुन्ह्यातील अनोळखी आरोपींची ओळख पटवून त्यांना तत्काळ अटक करण्याचे आदेश पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी गुंडाविरोधी पथकाला दिले होते. त्या अनुषंगाने पोलीस उपायुक्त किरणकुमार चव्हाण, सहाय्यक पोलीस आयुक्त संदीप मिटके यांनी गुंडाविरोधी पथकाचे अधिकारी व अंमलदार यांना आरोपींचा शोध घेण्याबाबत सूचना करून मार्गदर्शन केले.

गुंडाविरोधी पथकाचे प्रभारी अधिकारी ज्ञानेश्वर मोहिते व अंमलदार मलंग गुंजाळ, विजय सूर्यवंशी, सुनील आडके, प्रदीप ठाकरे, अक्षय गांगुर्डे, गणेश भागवत, कल्पेश जाधव, दयानंद सोनवणे, गणेश महाले हे सीसीटीव्ही फुटेजची तपासणी करून ते गुन्ह्याविषयीची माहिती काढत होते.

त्यावेळी पोलीस पोलीस अंमलदार अक्षय गांगुर्डे यांना माहिती मिळाली की, आरोपी हे समता नगर, आगार टाकळी रोड येथील राहणारे असून त्याच परिसरात त्यांचा शोध घ्या. त्यानुसार गुंडाविरोधी पथकाचे अधिकारी व अंमलदार यांनी समता नगर परिसराला घेराव घालून संशयित आरोपींचा शोध सुरू केला. हा शोध घेत असताना प्रेम गांगुर्डे नावाचा मुलगा सलूनच्या दुकानातून घाईघाईने कटिंग करून पळून गेल्याचे पोलिसांना समजले.

त्यानुसार पथकाने आरोपी प्रेम प्रदीप गांगुर्डे (वय 19 रा. आगर टाकळी रोड, समता नगर, नाशिक) याला राहत्या घरातून ताब्यात घेतले. त्याला पोलिसी खाक्या दाखवताच त्याने हा गुन्हा दोन साथीदारांसोबत केल्याची कबुली दिली. पोलिसांनी त्याच्या दोन साथीदारांना देखील ताब्यात घेतले. हे दोघेही विधी संघर्षित बालक असल्याने त्यांना ताब्यात घेऊन गुन्ह्याबाबत विचारपूस केली असता यातील एक विधी संघर्षित बालक हा द्वारका येथील अरुण कुशन्स या दुकानामध्ये कामाला होता.

त्याच्या बाजूला असलेल्या कराड बंधू भेळ भत्ता दुकानात कामाला असलेल्या यश बत्तीशे या मुलासोबत काही महिन्यांपूर्वी त्याचे शाब्दिक वाद झाले होते. त्या भांडणाचा बदला घेण्यासाठी त्यांनी हे कृत्य केल्याचे आरोपींनी सांगितले. आरोपी प्रेम गांगुर्डे व दोन विधी संघर्षित बालकांना पोलिसांनी ताब्यात घेऊन पुढील कारवाईसाठी मुंबई नाका पोलिसांच्या हवाली केले.
इतर बातम्या
Join Whatsapp Group