एक लाख रुपयांची लाच घेताना सिन्नरच्या पोलीस उपनिरीक्षकाला लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले आहे.
राजू ब्रिजलाल पाटील (वय 42) असे लाच घेणाऱ्या पोलीस उपनिरीक्षकाचे नाव आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, तक्रारदार यांच्या मुलाविरुद्ध सिन्नर एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. या गुन्ह्यात तक्रारदार यांच्या मुलास अटक करण्यात आली आहे.
या गुन्ह्याच्या अनुषंगाने त्यास वाढीव पोलीस कोठडी न मागण्यासाठी तसेच आरोपीला लवकरात लवकर जामीन होण्यासाठी व तपासात सहकार्य करून चार्जशीट दाखल करतेवेळी केस कच्ची करण्यासाठी राजू पाटील यांनी तक्रारदार यांच्याकडे एक लाख साठ हजार रुपयांची लाचेची मागणी केली. तडजोडीअंती एक लाख रुपयांची लाच घेण्याचे मान्य केले.
तक्रारदाराने याबाबत लाच लूचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली असता त्यांनी पोलीस ठाण्याच्या आवारात सापळा रचला. तक्रारदाराकडून एक लाख रुपयांची लाच घेताना त्यांना 24 नोव्हेंबर रोजी रंगेहाथ पकडण्यात आले.