नाशिक (भ्रमर प्रतिनिधी) :- गडकरी चौकातील एका सरकारी कार्यालयाच्या परिसरात पहाटे बिबट्या दिसून आला.
वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी तत्काळ घटनास्थळी दाखल होत बिबट्याचा शोध सुरू केला मात्र परिसरात व आजूबाजूला बिबट्याचा शोध घेतला असता बिबट्या मिळून आला नाही.
आज पहाटे 4.30 वाजता गडकरी चौक येथील विशेष पोलीस महानिरीक्षक कार्यालयाच्या परिसरात रात्रपाळी कर्तव्यावर असणारे पोलीस अंमलदार यांना वन्यप्राणी बिबट दिसून आला.
ही माहिती त्यांनी तत्काळ वनविभागाला कळवली. माहिती मिळताच तत्काळ वनपरिक्षेत्र अधिकारी यांच्यासह वन्यप्राणी बचाव पथक, रेस्क्यू नाशिक डिव्हिजन, नाशिक शहर पोलिसांचे श्वान पथक (गुगल श्वान) तसेच पोलीस पथक घटनास्थळी दाखल झाले.
सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केली असता त्यामध्ये वन्यप्राणी बिबट्याचा वावर दिसून आला. त्यानंतर थर्मल ड्रोन तसेच श्वानपथकाच्या मदतीने सर्व अधिकारी कर्मचारी यांनी IGP ऑफिस व शासकीय निवासस्थान परिसर पूर्ण पिंजून काढला.
तसेच नाशिक शहर पोलीस उपायुक्त कार्यालय, मुख्य वनसंरक्षक (प्रादेशिक) नाशिक यांचे कार्यालयाच्या संपूर्ण परिसरात शोध मोहीम राबविण्यात आली. या मोहिमेत वन्यप्राणी बिबट आढळून आला नाही.
शहर परिसरात अधून मधुन बिबट्याचा वावर दिसून येत आहे. काही दिवसांपूर्वीच महात्मानगर परिसरात बिबट्याचे रेस्क्यू करण्यात आले होते.
नागरिकांना आवाहन:
सर्व नागरिकांना वनविभागाच्या वतीने आवाहन करण्यात येते की परिसरात वावरताना दक्षता घ्यावी, विशेष करून लहान मुलांची काळजी घ्यावी तसेच कुठेही वन्य प्राण्यांचा वावर आढळून आल्यास तात्काळ वन विभागाशी संपर्क करावा.