नाशिकरोड (भ्रमर प्रतिनिधी) :- खासगी सावकाराने बंदुकीचा धाक दाखवून एका हॉटेल व्यावसायिकाकडून आठ लाख रुपयांची खंडणी घेतल्याची घटना उघडकीस आली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी, की फिर्यादी किरण भास्कर कानडे (वय 45, रा. मु. पो. नांदुरी, ता. कळवण, जि. नाशिक) हे हॉटेल व्यावसायिक असून, त्यांचे गौतमी नावाचे हॉटेल आहे. कानडे यांना हॉटेल व्यवसायासाठी पैशांची गरज असल्याने त्यांनी सन 2014 ते एप्रिल 2025 या काळात खासगी सावकार चंद्रशेखर प्रभाकर शिंदे ऊर्फ पिंटू शिंदे (रा. नाशिकरोड) याच्याकडून अजय दुबे याच्या मध्यस्थीने तीन लाख रुपये व्याजाने घेतले होते. हा व्यवहार पिंटू शिंदे याच्या नाशिकरोड येथील कार्यालयात झाला.
त्या बदल्यात शिंदे याने फिर्यादी कानडे व त्यांच्या भावाच्या नावावर असलेला प्लॉट रजिस्टर साठेखताने स्वत:च्या नावावर जबरदस्तीने लिहून घेतल्याचे कानडे यांनी फिर्यादीत म्हटले आहे. या काळात कानडे व्याजाची रक्कम देऊ न शकल्याने शिंदे याने कानडे यांचे हॉटेल गौतमी व त्यांचे वडिलोपार्जित घर रजिस्टर खरेदी खताने स्वत:च्या नावावर लिहून घेतले.
या खरेदी खताच्या आधारे त्याने कळवण येथील अंबिका पतसंस्थेतून स्वत:च्या नावावर कर्ज घेऊन त्या कर्जाची परतफेड कानडे यांना जबरदस्तीने करण्यास भाग पाडले. शिंदेने कानडे यांना ऑफिसमध्ये बोलावून पिस्तुलाचा धाक दाखवीत जिवे मारण्याची धमकी दिली.
त्यानंतर कानडे यांच्या मालकीचे हॉटेल व घर कानडे यांच्या नावावर करण्यासाठी शिंदे याने आणखी 15 लाख रुपयांची मागणी केली. या रकमेपैकी त्याने जबरदस्तीने धाक दाखवून आठ लाख रुपये खंडणीच्या स्वरूपात वसूल केले. या सर्व प्रकारादरम्यान मध्यस्थी असलेल्या अजय दुबेनेदेखील फिर्यादी कानडे यांना मारहाण करून धमकी दिली.
या प्रकरणी कानडे यांच्या फिर्यादीवरून उपनगर पोलीस ठाण्यात पिंटू शिंदे व अजय दुबे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दोघांना अटक केली आहे.