नाशिक रोड (भ्रमर प्रतिनिधी): वसई-विरार परिसरातील वालीव पोलीस ठाणे हद्दीत सराफाच्या दुकानात लुटमार करण्याच्या उद्देशाने प्रवेश करून सराफावर चाकूने हल्ला करणारे आणि त्यानंतर लहान लेकरासह मुंबईहून पळून जाणारे दांपत्य नाशिक रोड लोहमार्ग पोलिसांनी अवघ्या काही तासांत शिताफीने ताब्यात घेतले. हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या सराफाची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
मिळालेल्या माहितीनुसार, मंगळवार (९ डिसेंबर) रोजी काळूसिंग जयसिंग खरवट यांच्या सराफाच्या या अंबिका ज्वेलर्स दुकानात सोन्याची अंगठी घेण्याच्या बहाण्याने दांपत्य लहान लेकरासह आले. अंगठ्यांची पाहणी करताना महिलेनं मुलांना पाणी द्यावे असे सांगितल्यानंतर सराफ पाणी घेण्यासाठी मागे गेला. त्याचा फायदा घेत तरुणाने त्याच्या मागे जाऊन तीक्ष्ण हत्यार लावून धमकी दिली. सराफाने प्रतिकार केल्यावर आरोपीने त्याच्या पोटात व मानेवर वार केले. आरडाओरड झाल्यानंतर दांपत्य मुलासह दुकानातून पसार झाले.
सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे पोलिसांना संशयित दांपत्य उद्योग नगरी एक्सप्रेसने उत्तर प्रदेश झाशीला जात असल्याची माहिती वालव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक बोडके यांनी दिली. वसई-विरार पोलिसांनी तत्काळ माहिती नाशिक रोड लोहमार्ग पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन बनकर यांना पाठवली. त्यानुसार तपास पथकाने रेल्वे तपासणी सुरू केली.
संध्याकाळी अंदाजे ८.०० ते ८.३० वाजता उद्योग नगरी एक्सप्रेस नाशिक रोड स्टेशनवर आल्यानंतर गुन्हे शोध पथकाने तपासणी केली. त्यावेळी इंजिनजवळील जनरल बोगीत तोंडावर मास्क व टोपी घातलेला संशयित आढळला. चौकशीत त्याची ओळख पटली. त्यानंतर त्याच्या डब्यात झोपलेल्या पत्नीलाही सीसीटीव्ही फुटेजद्वारे पडताळून दोघांना ताब्यात घेण्यात आले. चौकशीत त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली. राज्याबाहेर पळून जाण्यापूर्वी काही तासांत दांपत्याला पकडण्यात लोहमार्ग पोलिसांनी दाखवलेल्या तत्परतेचे कौतुक होत आहे.
ही कारवाई लोहमार्ग पोलीस उपविभागीय अधिकारी स्वाती भोर व वसंत भोये यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन बनकर,सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक संतोष उफाडे पाटील, पोलीस उपनिरीक्षक सुनील वारुळे, पोलीस हवालदार शैलेश पाटील, राज बच्छाव, रघुनाथ सानप, संदीप उगले, सुभाष काळे यांनी यशस्वीरीत्या पार पाडली.