पालघर जिल्ह्यातील वसई शहरातील बऱ्हाणपूर उमेळमान गावात एका 60 वर्षीय महिलेची राहत्या घरात घुसून निर्घृण हत्या झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. ‘भिमाई’ नावाच्या बंगल्यात एकट्याच राहणाऱ्या दुर्गा संजयराव बनसोडे (वय 60) यांचा मृतदेह त्यांच्या बेडरूममध्ये आढळून आला. ही घटना सोमवारी मध्यराञी १२ च्या दरम्यान उघड झाली होती. माणिकपूर पोलिसांनी अवघ्या २ तासात या घटनेचा छडा लावून, दोन आरोपींना ताब्यात घेतलं आहे.
हे दोघे अल्पवयीन असल्याची माहिती आहे. मुख्य आरोपी हा मयताच्या भावाचा मुलगा आहे आणि तो घराच्या जवळच राहतो. तो अवघा १५ वर्षाचा असल्याची माहिती समोर आली आहे, त्याच्यासोबत असणारा त्याचा मिञ हा अवघा १६ वर्षाचा आहे. माणिकपूर पोलिसांनी सध्या दोघांना ताब्यात घेतलं असून, त्यांच्याकडून हत्येच्या कारणांची माहिती घेत असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक हरिलाल जाधव यांनी दिली आहे.
वसईच्या बऱ्हाणपूर उमेळमान गावात, भिमाई या बंगल्यात दुर्गा संजय बनसोडे ही ६० वर्षीय महिलेची हत्या करण्यात आली होती. ही महिला घरात एकटी रहात होती. तिचा मुलगा वालीव येथे रहात होता. सोमवारी सकाळपासून दुर्गा या फोन उचलत नसल्याने मुलाने रात्री येवून, बघितल्यावर हॅालच्या आत रक्ताचे डाग दिसले, त्यामुळे पोलिसांना बोलावण्यात आले. त्यानंतर ही घटना उजेडात आली.
मृतदेह बेडरूम मध्ये होता आणि बेड वरील गादी काढून बेड उघडण्यात आलं होतं. तसेच बेडरूमच्या दरवाजाला बाहेरून स्क्रूड्रायव्हर लावण्यात आलं होतं. प्राथमिक माहितीनुसार मयत आत्या काहीतरी कारणावरुन ओरडल्याने त्याच्या मनात आत्येविषयी राग होता, आणि रागातून ही हत्या केल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे.