लातूरमध्ये आयकर अधिकाऱ्याची हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली. मुलानेच पोटात चाकू भोसकून बापाला संपवलं. कृष्णकुमार सन्मुखराव असं हत्या झालेल्या अधिकाऱ्याचे नाव होतं. या घटनेमुळे लातूरमध्ये खळबळ उडाली. या प्रकरणी लातूर पोलिसांनी आरोपीविरोधात गुन्हा दाखल करत त्याला अटक केली. आईच्या औषधाेपचारासाठी पैसे का देत नाही? आमचा सांभाळ का करत नाही?’ असा जाब विचारत पोटच्या २९ वर्षीय मुलाने हे कृत्य केल्याने खळबळ उडाली आहे.
पाेलिसांनी सांगितले, लातूर येथील आयकर अधिकारी कृष्णकुमार संभाजी सन्मुखराव (वय ५४) आणि मोठा मुलगा शंतनू (२९) यांच्यात मंगळवारी सकाळी पावणेदहा वाजण्याच्या सुमारास वाद झाला. शंतनूची आई आजारी असल्याने तिने औषधोपचारासाठी पैशांची मागणी केली. दरम्यान, आई-वडिलांमध्ये कडाक्याचे भांडण सुरू झाले. हे भांडण सुरू असताना कृष्णकुमार यांनी मुलगा शंतनू याला थापड मारल्या. शिवाय, वृद्ध आजाेबा यांनीही त्याला ढकलून दिले. या भांडणाचे रूपांतर हाणामारीत झाले.
यातूनच मुलाने रागाच्या भरात ‘तुम्ही आईच्या उपचारासाठी पैसे का देत नाही?, आमचा सांभाळ का करत नाही?’ असा जाब विचारत घरातील भाजी कापण्याचा चाकू आणला अन् थेट वडिलांच्या मानेवर जबर वार केले. यामध्ये कृष्णकुमार यांचा जागीच मृत्यू झाला. याप्रकरणी लातूर ग्रामीण पाेलिस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल केला असून, आराेपी मुलगा शंतनू याला पाेलिसांनी अटक केली. घटनास्थळावरून चाकू जप्त केला आहे. लातूर न्यायालयात बुधवारी दुपारी हजर केले असता, न्यालयालयाने तीन दिवसांची पाेलिस काेठडी सुनावली आहे.