झारखंडमधील हजारीबाग येथे आई- लेकीच्या नात्याला काळिमा फासणारी घटना घडली आहे. १३ वर्षाच्या लेकीसाठी तिची जन्मदाती आईच काळ ठरली. पुत्रप्रेम आणि अंधश्रध्देत बुडालेल्या आईने पोटच्या लेकीचाच बळी दिल्याचे उघड झाले आहे.
मुलीची आई तिच्या लहान मुलाच्या आजारपणामुळे खूप व्यथित होती आणि वारंवार एका तांत्रिकाकडे जात असे. त्या तांत्रिकाने तिला पटवून दिले होते की, तिच्या मुलाला बरे करण्यासाठी एका 'कुमारी मुलीचा' बळी द्यावा लागेल. येथूनच मुलीच्या हत्येच्या धोकादायक कटाची सुरुवात झाली, ज्यात एका निष्पाप मुलीचा जीव गेला.
नेमकं काय घडलं?
ही घटना २४ मार्चच्या रात्री घडली, जेव्हा संपूर्ण गावात रामनवमीची मंगला मिरवणूक सुरू होती. गर्दी आणि उत्सवाचा फायदा घेऊन त्या मुलीला आधी मंदिरात नेण्यात आले. पूजेच्या नावाखाली तिच्या हाताला कुंकू आणि काजळ लावण्यात आले आणि नंतर तिला एका निर्जन ठिकाणी नेण्यात आले. पोलिसांच्या म्हणण्यानुसार, तिच्या आईच्या मदतीने तिचा तिथेच गळा दाबून खून करण्यात आला.
समोर आलेल्या माहितीनुसार, मुलीचं अपहरण करून तिची हत्या झाल्याचा आरोप करत मुलीच्या आईने सुरुवातीला पोलिसांत तक्रार दाखल केली होती. मात्र, पोलिसांनी सखोल तपास करून तांत्रिक पुरावे गोळा केल्यावर या प्रकरणाला पूर्णपणे वेगळे वळण लागले. विशेष तपास पथकाच्या (एसआयटी) तपासात असे उघड झाले की, या भयंकर कटात स्वतः आई, एक महिला तांत्रिक आणि आणखी एक व्यक्ती सामील होते. या तिघांनाही अटक करण्यात आली आहे.
तपासात असेही उघड झाले की, हत्येनंतर मुलीच्या मृतदेहावर आणखी अमानुष अत्याचार करण्यात आले. तिच्या गुप्तांगात काठी घालण्यात आली तसेच तिच्या रक्ताचा वापर एका तांत्रिक विधीमध्ये करण्यात आल्याचा आरोप आहे. त्यानंतर पुरावा नष्ट करण्यासाठी मृतदेह एका बागेत पुरण्यात आला. आरोपींनी सुरुवातीला मुलीवर बलात्कार करून तिची हत्या केल्याचे भासवण्याचा प्रयत्न केला. परंतु शवविच्छेदन अहवालात पोलिसांना संशय येईल असे काहीही आढळले नाही आणि सत्य समोर आले.