सर्वत्र रामनवमी उत्साहात साजरी केली जात असताना गुरूवारची सकाळ अमरावती पोलीस आयुक्त कार्यालय हादरवणारी ठरली. पोलीस आयुक्त कार्यालयात स्वतःवर गोळी झाडून पोलीस शिपायाने आपली जीवनयात्रा संपवलीय. शीघ्र कृती दलाच्या (क्यूआरटी) जवानाने कक्षातच पिस्तुलातून स्वत:वर गोळी झाडून आत्महत्या केली. या घटनेने पोलीस वर्तुळात खळबळ उडाली आहे.
विजय नागापुरे (वय ३५) असे आत्महत्या करणाऱ्या पोलीस जवानाचे नाव आहे. विजय नागापुरे हे रात्रपाळीत कर्तव्यावर होते. ते सकाळी पोलीस आयुक्त कार्यालयासमोरील पोलीस मुख्यालयाच्या मैदानावर पोहचले. आपल्या सहकाऱ्यांसमवेत ते काहीवेळ क्रिकेट खेळले त्यानंतर ते पोलीस आयुक्त कार्यालयात पोहचले. सुमारे ९.३० वाजताच्या सुमारास ‘क्यूआरटी’ कक्षात ते गणवेश घालण्यासाठी गेले. सर्व जवान बाहेर गेल्यानंतर त्यांनी पिस्तुलातून डोक्यावर गोळी झाडली. त्यांचे सहकारी कक्षाच्या दिशेने धावत गेले, पण, तोवर त्यांचा मृत्यू झाला होता.
विजय नागापुरे यांच्या आत्महत्येचे कारण अद्याप अस्पष्ट आहे. माहितीनुसार, विजय नागापुरे हे आपल्या सहकाऱ्यांसोबत सकाळी होते, तेव्हा त्यांचा व्यवहार सामान्य होता. अचानक काय घडले, की त्यांनी टोकाचे पाऊल उचलले, हा प्रश्न त्यांच्या सहकाऱ्यांना पडला आहे. घटनेची माहिती मिळताच पोलीस आयुक्त राकेश ओला, पोलीस उपायुक्त गणेश शिंदे, शाम घुगे यांच्यासह वरिष्ठ अधिकारी तात्काळ घटनास्थळी दाखल झाले.
विजय नागापुरे हे मूळचे मोर्शी तालुक्यातील धामणगाव काटपूर येथील रहिवासी होते. सध्या ते अमरावती शहरात कुटुंबासह राहत होते. ते २०१४ च्या बॅचमध्ये पोलीस खात्यात रुजू झाले होते. त्यांच्या पश्चात कुटुंबीय असून त्यांचा भाऊ श्याम नागापुरे हे देखील शहर पोलीस दलात कार्यरत आहेत. दरम्यान, आत्महत्येमागील नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. पोलीस विभागाकडून या प्रकरणाचा सखोल तपास सुरू आहे. पोलिसांवरील कामाचा ताण हा विषय गेल्या अनेक वर्षांपासून चर्चेत आहे. या घटनेने अनेक जुन्या घटनांना उजाळा मिळाला आहे.