चेंबूरमध्ये ३.५ कोटींचे हस्तिदंत जप्त! आंतरराष्ट्रीय स्तरावरील टोळीचा पर्दाफाश; आलिशान हॉटेलमध्ये पोलिसांनी रचला सापळा
चेंबूरमध्ये ३.५ कोटींचे हस्तिदंत जप्त! आंतरराष्ट्रीय स्तरावरील टोळीचा पर्दाफाश; आलिशान हॉटेलमध्ये पोलिसांनी रचला सापळा
img
नितीशा कुलकर्णी





प्राण्याच्या तस्करी करण्याच्या घटना वाढतच आहेत. त्यातच आता अशी बातमी समोर आली आहे जी एकुन तुम्हालाही धक्का बसेल. चक्क हत्तीचे दात विक्री करणारी टोळी पोलीसाच्या हाती लागली.


एका नामांकित हॉटेलमध्ये हस्तिदंतांची विक्री करण्यासाठी काही तस्कर येणार असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली होती.


चेंबूर पोलिसांनी आंतरराष्ट्रीय स्तरावर तस्करी करणाऱ्या एका टोळीचा पर्दाफाश केला असून, तब्बल ३.५ कोटी रुपये किमतीचे अवैध हस्तिदंत जप्त केले आहेत. या प्रकरणी पोलिसांनी चार जणांना अटक केली असून त्यांच्याकडून ३१ किलोहून अधिक वजनाचे दोन हस्तिदंत हस्तगत करण्यात आले आहेत.


हॉटेलमध्ये रचला सापळा

मिळालेल्या माहितीनुसार, चेंबूरमधील आरसी मार्गावरील एका नामांकित हॉटेलमध्ये हस्तिदंतांची विक्री करण्यासाठी काही तस्कर येणार असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे चेंबूर पोलिसांनी हॉटेल परिसरात सापळा रचला. संशयास्पदरित्या आढळलेल्या चौघांची झडती घेतली असता त्यांच्याकडे हस्तिदंत आढळून आले.


३१ किलो वजनाचे हस्तिदंत जप्त

आरोपींकडून पोलिसांनी दोन हस्तिदंत जप्त केले आहेत. त्यातील एकाचे वजन ११ किलो असून दुसऱ्याचे वजन २०.६ किलो आहे. एकूण ३१.६ किलो वजनाच्या या हस्तिदंतांची आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील किंमत अंदाजे ३.५ कोटी रुपये असल्याचे सांगण्यात येत आहे.

याशिवाय ४ मोबाईल फोनही जप्त करण्यात आले आहेत. जप्त केलेल्या मुद्देमालाची एकूण किंमत सुमारे ३ कोटी ५० लाख ४० हजार रुपये इतकी असल्याचे पोलिसांनी सांगितले.

या प्रकरणी भारतीय दंड संहिता तसेच वन्यजीव संरक्षण अधिनियम १९७२ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास चेंबूर पोलीस करीत आहेत.

इतर बातम्या
Join Whatsapp Group