आधी लॉकअपमधून पलायन, मग घरी जाऊन पोटभर जेवण आणि त्यानंतर थेट बेडवर जाऊन ताणून दिली... हे एखाद्या चित्रपटाचे कथानक नसून पुंडलिकनगर पोलीस ठाण्यात घडलेला प्रत्यक्ष प्रकार आहे.
व्हीआयपी दौऱ्याच्या बंदोबस्तात पोलीस यंत्रणा गुंतलेली असताना, मुकुंदवाडीतील एका लुटारूने पोलिसांच्या डोळ्यादेखत पोलीस ठाणे सोडले.
आरोपी पळून गेल्याचे लक्षात येताच पोलिसांची पाचावर धारण बसली, मात्र तो कुठेही न जाता स्वतःच्या घरी निवांत झोपलेला सापडल्याने पोलिसांनी सुटकेचा नि:श्वास टाकला मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यामुळे शहरातील पोलीस यंत्रणा तणावात आणि बंदोबस्तात व्यग्र असताना, एका आरोपीने मात्र अक्षरशः ‘ब्रेक’ घेतला तोही थेट पोलीस ठाण्यातून बाहेर पडून.
भूक लागल्याचं कारण देत त्याने लॉकअपमधून सुटका करून घेतली, घरी जाऊन जेवण केलं आणि निवांत झोप काढली. काही वेळाने पोलिसांनीच त्याला पुन्हा अंथरुणातून उचलत कोठडीत आणलं. 25 एप्रिलच्या रात्री मुकुंदवाडी परिसरात एका प्रवाशाला लुटण्याच्या प्रकरणात अभिषेक उर्फ भय्या भूमकर (21) याला गुन्हे शाखेच्या पथकाने पकडलं होतं. त्याच्यासोबत सोमीनाथ उर्फ सोनू नरोडे (23) यालाही अटक करण्यात आली होती.
दोघांकडून चोरीचा मोबाईल जप्त करण्यात आला. घटनेवेळी अभिषेक नशेत असल्याचंही समोर आलं. रविवारी शहरात व्हीआयपी दौरा असल्याने बहुतांश पोलीस बंदोबस्तासाठी तैनात होते. त्यामुळे पुंडलिकनगर पोलीस ठाण्यात कर्मचारीसंख्या कमी होती. याच संधीचा फायदा घेत, लॉकअपमध्ये असलेल्या अभिषेकची नशा उतरली आणि त्याला भूक लागली.
आसपास कोणी लक्ष देत नसल्याचं पाहून त्याने शांतपणे ठाण्यातून काढता पाय घेतला. तो कुठे फरार झाला नाही, तर थेट आपल्या मुकुंदवाडीतील घरी पोहोचला.
घरी जाऊन पोटभर जेवण केलं आणि मग निर्धास्तपणे झोपून गेला. दरम्यान, काही वेळानंतर आरोपी गायब असल्याचं लक्षात येताच पोलिसांची धावपळ सुरू झाली. शोध घेत असताना तो घरीच असल्याची माहिती मिळाली.
पोलिसांनी तत्काळ घर गाठलं, तेव्हा अभिषेक निवांत झोपलेला आढळला. त्याला उठवून पुन्हा पोलीस ठाण्यात आणण्यात आलं. या विचित्र प्रकारामुळे काही काळ पोलिसांमध्ये खळबळ उडाली, तर “भूक लागली म्हणून आरोपी थेट घरी गेला” ही चर्चा शहरात रंगली आहे.