भारतीय कुस्ती महासंघाचे माजी अध्यक्ष आणि भाजपचे माजी खासदार बृजभूषण शरण सिंह यांना मोठा दिलासा मिळाला आहे. दिल्लीच्या एका न्यायालयाने त्यांना पोक्सोमधून मुक्त केलं आहे. दिल्लीच्या राऊज एव्हेन्यू कोर्टाने हा निर्णय दिला आहे. पोलिसांनी या प्रकरणाचा क्लोजर रिपोर्ट कोर्टात सादर केला होता. कोर्टाने हा रिपोर्ट स्वीकारला आहे. कोर्टाच्या या निर्णयानंतर पोक्सोची कार्यवाही संपल्याचं मानलं जात आहे. या निर्णयावर बृजभूषण शरण सिंह यांनी समाधान व्यक्त केलं आहे. महिला पहिलवानांनी बृजभूषण शरण सिंह यांच्यावर लैंगिक शोषणाचे आरोप केले होते. या प्रकरणारवरून महिला पहिलवानांनी जंतरमंतरवर मोठं आंदोलन केलं होतं. बरेच दिवस हे आंदोलन चाललं होतं. मात्र, आपल्यावरील सर्व आरोप चुकीचं असल्याचं बृजभूषण सिंह पहिल्या दिवसापासून म्हणत होते. माझ्याविरोधातील आरोप सिद्ध झाले तर फासावर लटकेल, असंही बृजभूषण सिंह म्हणाले होते.
गेल्या वर्षी मे महिन्यात दिल्लीच्या राऊज एव्हेन्यू कोर्टात या प्रकरणी सुनावणी झाली होती. पुरेसे पुरावे असल्याने बृजभूषण यांच्या विरोधात आरोप निश्चित करण्याचे कोर्टाने आदेश दिले होते. अतिरिक्त मुख्य मेट्रोपोलिटन मॅजिस्ट्रेट प्रियंका राजपूत यांनी बृजभूषण यांच्या विरोधात आयपीसी कलम 354, 354 ए आणि 506 अंतर्गत आरोप निश्चित करण्याचे आदेश दिले होते.
कोर्ट काय म्हणालं?
दरम्यान, आज बृजभूषण सिंह यांना दिल्लीच्या राऊज एव्हेन्यू कोर्टाने निर्दोष मुक्त केलं आहे. पुराव्या अभावी बृजभूषण यांची सुटका करण्यात येत असल्याचं कोर्टाने म्हटलं. बृजभूषण हे 20 जुलै 2023 पासून नियमित जामिनावर होते. 10 मे 2024 रोजी कोर्टाने चार्जशीटच्या आधारे आरोप निश्चित केले होते. त्यानंतर ट्रायल सुरू झाला होता.
मी जे बोललो…
दरम्यान, या निर्णयानंतर बृजभूषण सिंह यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. मी जे आधीच बोललो होतो ते आता खरं होत आहे, असं ते म्हणाले. तर आम्ही कोर्टाच्या आदेशाची वाट पाहत आहोत, असं त्यांच्या वकिलाने म्हटलं आहे. तक्रार आणि तक्रारदाराच्या साक्षीत तफावत असल्याचं आम्ही आधीपासूनच सांगत होतो. त्यानुसार निर्णय आला आहे. आता आम्ही कोर्टाच्या आदेशाची वाट पाहत आहोत. त्यानंतर सविस्तर प्रतिक्रिया देऊ, असंही वकिलाने स्पष्ट केलंय.