अब्जाधीश उद्योगपतींना मागे टाकत दागिन्यांच्या व्यापाऱ्याने मारली बाजी; जुहू बीचवरचा ऐतिहासिक बंगला २२१ कोटींना खरेदी!
अब्जाधीश उद्योगपतींना मागे टाकत दागिन्यांच्या व्यापाऱ्याने मारली बाजी; जुहू बीचवरचा ऐतिहासिक बंगला २२१ कोटींना खरेदी!
img
Jayshri Rajesh

मुंबई: मुंबईतील रिअल इस्टेट क्षेत्रात पुन्हा एकदा एका मोठ्या आणि ऐतिहासिक व्यवहाराची नोंद झाली आहे. जुहू बीचवर अरबी समुद्राच्या समोर असलेला प्रसिद्ध 'लीला' बंगला तब्बल २२१ कोटी रुपयांना विकला गेला आहे. विलेपार्ले येथील प्रसिद्ध नानावटी सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलचे प्रवर्तक नानावटी कुटुंबाने या बंगल्याची विक्री केली आहे. 



हा आलिशान बंगला मुंबईतील प्रसिद्ध दागिन्यांचे व्यापारी असलेल्या नोटांदास समूहाच्या 'नोटांदास रियल्टी'ने खरेदी केला आहे. नोटांदास समूहाचे संचालक महेश जगवानी आणि हर्ष जगवानी यांनी हा कोट्यवधींचा व्यवहार पूर्ण केला आहे.

हा बंगला जुहू तारा रोडवर समुद्रकिनारी अत्यंत मोक्याच्या ठिकाणी स्थित आहे. हा ६ बीएचके बंगला सुमारे ७० वर्षे जुना असून तो सुमारे १३५५ चौरस मीटरच्या विस्तीर्ण भूखंडावर उभा आहे. या भागात समुद्राभिमुख मालमत्तांना मोठी मागणी असते आणि त्यामुळेच हा व्यवहार मुंबईतील सर्वात महागड्या आणि मोठ्या व्यवहारांपैकी एक ठरला आहे.

मात्र, कोट्यवधी रुपये खर्च करून खरेदी केलेल्या या बंगल्याबाबत एक मोठी तांत्रिक अडचण आहे. 'लीला' बंगला हा मुंबई महापालिकेच्या हेरिटेज यादीत 'Grade IIB' श्रेणीत मोडतो. याचा अर्थ असा की ही वास्तू हेरिटेज श्रेणीत येत असल्याने खरेदीदाराला हा बंगला पाडता येणार नाही. जुन्या रचनेला धक्का न लावता किंवा त्यात कोणताही मोठा बदल न करता केवळ दुरुस्ती करूनच नव्या मालकांना याचा वापर करावा लागणार आहे. या नियमांमुळे खरेदीदाराला या जागेवर कोणतीही मोठी टोलेजंग इमारत उभारता येणार नाही.

असे निर्बंध असतानाही समुद्रासमोरील मोक्याची जागा आणि वास्तूचे ऐतिहासिक महत्त्व लक्षात घेऊन नोटांदास समूहाने हा मोठा व्यवहार केला आहे. या व्यवहारामुळे मुंबईच्या रिअल इस्टेट वर्तुळात सध्या याच बंगल्याची जोरदार चर्चा रंगली आहे.

इतर बातम्या
Join Whatsapp Group