राज्यातील राजकीय घडामोडींना वेग आला असून आता राज्यात पुन्हा एकदा निवडणुकीचे बिगुल वाजणार आहे. समोर आलेल्या माहितीनुसार , राज्य विधान परिषदेतील स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघांतील अनेक रिक्त जागांसाठी निवडणूक प्रक्रिया जाहीर करण्यात आली आहे.
भारतीय निवडणूक आयोगाने राज्यातील विधान परिषदेच्या स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या प्रदीर्घ काळापासून रिक्त असलेल्या १६ जागांसाठी अखेर अधिकृत निवडणूक कार्यक्रम जाहीर केला आहे. एकूण १६ जागांसाठी मतदान १८ जून २०२६ रोजी होणार असून, निकाल २२ जून २०२६ रोजी जाहीर केले जाणार आहेत. या घोषणेनंतर राज्यातील राजकीय हालचालींना वेग आला असून विविध पक्षांकडून तयारी सुरू झाली आहे.
निवडणूक आयोगाच्या नियमांनुसार, स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघात निवडणूक घेण्यासाठी संबंधित मतदारसंघातील किमान ७५% स्थानिक स्वराज्य संस्था कार्यरत असणे आणि किमान ७५% मतदार (लोकप्रतिनिधी) पदावर असणे अनिवार्य आहे. महाराष्ट्रात या निकषांची पूर्तता न झाल्यामुळे या १६ जागांवर वेळेत निवडणूक घेता आली नव्हती. मात्र, आता या सर्व अटी व निकष पूर्ण झाले असल्याचा अहवाल महाराष्ट्राच्या मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांनी (CEO) दिल्यानंतर निवडणूक आयोगाने तत्परतेने हा निवडणूक कार्यक्रम जाहीर केला आहे.
दरम्यान , निवडणूक आयोगाच्या या घोषणेसोबतच संबंधित मतदारसंघांच्या कार्यक्षेत्रात ‘आदर्श निवडणूक आचारसंहिता’ तातडीने लागू करण्यात आली आहे. स्थानिक पातळीवरील नगरसेवक, जिल्हा परिषद सदस्य यांच्या संख्याबळावर या जागांचे भवितव्य ठरणार असल्याने, आता महायुती आणि महाविकास आघाडीच्या नेत्यांमध्ये स्थानिक पातळीवर जोरदार मोर्चेबांधणी आणि राजकीय गणितांना सुरुवात झाली आहे.