राज्यात विजांच्या कडकडाटासह पाऊस कोसळणार; 'या' जिल्ह्यांना हवामान खात्याचा इशारा
राज्यात विजांच्या कडकडाटासह पाऊस कोसळणार; 'या' जिल्ह्यांना हवामान खात्याचा इशारा
img
Nandini khandare More

राज्यातून पावसाने काहीशी उसंत घेतल्यानंतर आता पुन्हा एकदा हवामानात मोठा बदल होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह मेघगर्जना आणि वादळी वाऱ्यांसह पाऊस पडण्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. त्यामुळे काही जिल्ह्यांना येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. नेमक्या कोणत्या जिल्ह्यांना पावसाचा इशारा देण्यात आला आहे? 

बंगालच्या उपसागरातील हवामानातील घडामोडींचा परिणाम राज्यातील वातावरणावर होत असून, अनेक जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. विशेषतः विदर्भ आणि मध्य महाराष्ट्रातील काही भागांना हवामान विभागाने येलो अलर्ट जारी केला आहे. त्यामुळे नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात येत आहे.

हवामान विभागाच्या अंदाजानुसार, आज राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये ढगाळ वातावरणासह विजांच्या कडकडाटात पाऊस पडू शकतो. तर काही ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या सरी कोसळण्याची शक्यता आहे. दुसरीकडे, राज्यातील उर्वरित भागांमध्ये आकाश अंशतः ढगाळ राहणार असून, कमाल आणि किमान तापमानात चढ-उतार पाहायला मिळू शकतात.

मध्य महाराष्ट्रातील नाशिक आणि अहिल्यानगर जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता आहे. विदर्भातील अमरावती, नागपूर, भंडारा, गोंदिया आणि गडचिरोली या जिल्ह्यांमध्येही पावसाचा जोर वाढण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. मराठवाड्यातील काही तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह पावसाच्या सरी कोसळू शकतात.

बंगालच्या उपसागरात 'अर्णब'चं थैमान दरम्यान, बंगालच्या उपसागरातील 'अर्णब' चक्रीवादळ धडकल्यानंतर त्याचा प्रभाव कमी होत असला, तरी हवामानात वेगवेगळे बदल बघायला मिळत आहेत. या चक्रीवादळामुळे दक्षिण कोकण आणि आसपासच्या परिसरात चक्राकार वाऱ्यांची स्थिती कायम आहे. याचदरम्यान दक्षिण अंदमान समुद्रात आणखी एका कमी दाबाच्या क्षेत्राची निर्मिती झाली आहे. आज पुन्हा चक्रवादळ तीव्र होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.
इतर बातम्या
Join Whatsapp Group