राज्यात आता पावसाने ब्रेक घेतला असून ऑक्टोबर महिन्यात उष्णतेचा तडाखा निर्माण होतो आहे. आज (५ ऑक्टोबर) मुंबईसह संपूर्ण कोकण किनारपट्टीवर प्रचंड उष्ण आणि दमट हवामान राहण्याचा अंदाज आहे. त्यामुळे हवामान विभागाने या भागात 'येलो अलर्ट' जारी केला आहे.
पाऊस थांबल्याने राज्यातील तापमान ३५ अंश सेल्सिअसच्या पार गेले आहे. पालघर, ठाणे, मुंबई, रायगड, सोलापूर आणि रत्नागिरी या जिल्ह्यांमध्ये हवामान प्रचंड दमट आणि उष्ण राहणार आहे. तर उर्वरित महाराष्ट्रात मुख्यत्वे आकाश निरभ्र राहून कडक ऊन आणि उकाडा वाढेल.
पुण्यात तिहेरी हवामान पुणे शहर आणि जिल्ह्यात गेल्या तीन दिवसांपासून उन्हाची तीव्रता वाढली आहे. सध्या पुणेकर एकाच वेळी तीन प्रकारच्या हवामानाचा अनुभव घेत आहेत. दुपारी कडक ऊन, मध्येच ढगाळ वातावरण आणि रात्री किंवा पहाटे गारवा अशी स्थिती निर्माण झाली आहे.
नागपुरात तापमान ३५ अंशांवर विदर्भातही ऑक्टोबरच्या पहिल्याच आठवड्यात उन्हाचे चटके बसू लागले आहेत. नागपुरात कमाल तापमान ३५ अंश सेल्सिअसवर पोहोचले आहे. दिवसा कडक ऊन आणि रात्रीच्या तापमानात घट असा बदल नागपूरकर अनुभवत आहेत. या संपूर्ण महिन्यात तापमान सरासरीपेक्षा जास्त राहील, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
उष्ण व दमट हवामानाचा इशारा (येलो अलर्ट) :
पालघर, ठाणे, मुंबई, रायगड, रत्नागिरी. उन्हाचा चटका अधिक असलेली ठिकाणे (तापमान अंश सेल्सिअसमध्ये) : मालेगाव ३८.४, अमरावती ३८, डहाणू ३७.९, रत्नागिरी ३७.७, जळगाव ३७.५, सांताक्रूझ ३७.४, अकोला ३७.१.