अहिल्यानगर जिल्ह्यात मागच्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या पावसाने धुमाकूळ घातला आहे. मंगळवारी कोसळलेल्या मुसळधार पावसामुळे रस्त्याला तलावांचे स्वरूप आले होते. शहरातील अनेक घरांमध्ये पाणी शिरले होते. तसेच काही रस्ते पाण्याखाली गेल्यामुळे वाहतूक बंद करण्यात आली होती. वाकळी येथे पावसाच्या पाण्यात थार गाडी वाहून गेल्याची माहिती आहे.

जिल्ह्यात शुक्रवार, शनिवार आणि रविवार असा सलग तीन दिवस सर्वदूर पावसाने हजेरी लावली होती. त्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले. तर मंगळावरी 3 तासांत विजांच्या कडकडाटासह नगर जिल्ह्यातील अहिल्यानगर शहर व तालुका, पारनेर, राहुरी, कर्जत श्रीगोंदा या तालुक्यात पावसाने पुन्हा जोरदार बेटींग केली.
त्यामुळे नदीनाल्यांना पूर आला आहे. जिल्ह्यातील 15 बंधारे पाण्याखाली गेले आहेत. यामुळे वाहतुकीच्या समस्या उद्भवत असून काही मार्ग बंद करण्यात आले आहेत. यामुळे अनेक गावांचे संपर्क देखील तुटले आहे.
काही भागांत ढगफुटी सदृश्य पाऊस झाल्याने भाजीपाला, कांदा, आंबा, केळी, पपई आदी फळबागांचे मोठे नुकसान झाले. या पावसामुळे शेतकऱ्यांची दाणादाण झाली. यामुळे हातातोंडाशी आलेली पिके उद्ध्वस्त झाले. शेतकऱ्यांवर आर्थिक संकट कोसळले आहे.
अवकाळीच्या हजेरीमुळे ग्रामीण भागातील पाण्याचे तलाव, ओढे, नाले तुडूंब भरले आहे. अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्यामुळे पुढील दोन दिवस पावसाचा जोर वाढण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
या पार्श्वभूमीवर नागरिकांनी सतर्क राहावे असे जिल्हा प्रशासनाने आवाहन केले आहे. नागरिकांनी अनावश्यक प्रवास टाळावा आणि सुरक्षित ठिकाणी राहावे, असा सल्ला देखील देण्यात आला आहे.
अकोळनेर, भोरवाडी तलाव ओव्हरफ्लो, धोंडेवाडी तलाव भरण्याच्या मार्गावर
मान्सून पूर्व पावसाने नगर तालुक्यात कहर केला आहे. मंगळवारी दुपारनंतर झालेल्या पावसाने पूर्वा व वालुंबा नदीला पूर आला. चास, कामरगाव, सारोळा कासार, भोरवाडी परिसरात अक्षशःहा ढगफुटीसदृष पाऊस झाला. तुफान झालेल्या पावसाने अकोळनेर व भोरवाडी तलाव एकाच पावसात ओव्हरफ्लो झाला. पुराच्या पाण्याचे धोंडवाडी तलाव बुधवार सकाळपर्यंत ओव्हरफ्लो होवू शकतो अशी स्थिती आहे.
नगर शहरात तुफान पाऊस
मंगळवारी नगर शहरात पावसाने दमदार बॅटिंग केली. शहरातील रस्त्यांना नदी नाल्याचे स्वरुप प्राप्त झाले होते. तुफान पावसाने आनंदऋषी परिसरातील झाड कोसळले. कोसळलेल्या झाडामुळे चार-पाच वाहनांचे नुकसान झाले आहे.
पुराच्या पाण्यात अडकले नागरिक
नगर तालुक्यात मंगळवारी पावसाने कहर केला. चास, अकोळनेर, सारोळा कासार, भोरवाडी, खडकी, बाबुड बेंद, वाळकी परिवरात मान्सून पूर्व पावसाने हाहाकार केला. गेल्या 50 वर्षात वालुंबा नदीला सर्वांत मोठा पूर आला. पुराच्या पाण्याने रौद्र रुप धारण केले होते. पुराच्या पाण्यात खडकी येथील 8 ते 10 नागरिक अडकले होते. याची माहिती मिळताच आपत्ती व्यवस्थापनाने घटनास्थळाकडे धाव घेतली. पुराच्या पाण्यात नागरिक अडकल्याचे माहिती मिळताच अनेकांनी पुराच्या पाण्यात अडकलेल्या नारिकांच्या मदतीसाठी प्रयत्न केले. अखेर पुरात अडकलेल्या नागरिकांना बाहेर काढण्यात यश आले आहे.