गेल्या काही दिवसांपासून मुसळधार पावसाने हैराण करून सोडले आहे. पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले असून बळीराजा हवालदिल झाला आहे. बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे ‘रागासा’ नावाचे चक्रीवादळ वेगाने विदर्भाच्या दिशेने सरकत आहे. या पार्श्वभूमीवर प्रादेशिक हवामान विभागाने नागपूरसह विदर्भातील अनेक जिल्ह्यांसाठी यलो आणि ऑरेंज अलर्ट जारी केला आहे.
याचा विदर्भावर सर्वाधिक परिणाम होणार असून अमरावती, गडचिरोली, गोंदिया या विदर्भातील शहरांसह ठाणे, मुंबई, पालघर, नाशिक, पुणे(घाटमाथ्यावरील क्षेत्र), सोलापूर, छत्रपती संभाजीनगर, बीड, लातूर या जिल्ह्यांना पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे. या पावसामुळे आणखी नुकसान होण्याची शक्यता आहे.
मागील आठवड्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे पूरस्थिती निर्माण झाली होती. अशा वेळी पुन्हा पावसाचा जोर वाढणार असल्याने नागरिक व शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. बंगालच्या उपसागरातील कमी दाबाचे क्षेत्र पोषक ठरल्याने राज्यात आजपासून (ता. २६) पावसाचा जोर वाढण्याची चिन्हे आहेत. कोकण, घाटमाथा, मराठवाडा आणि विदर्भात जोरदार सरींची शक्यता आहे. तसेच उर्वरित राज्यात तुरळक ठिकाणी विजांसह वादळी पावसाचा अंदाज असल्याने सतर्कतेचा इशारा (येलो अलर्ट) हवामान विभागाने दिला आहे.
दुसरीकडे गुरुवारी उन्हाचा चटका आणि उकाड्यातही वाढ झाली. गुरुवारी सकाळपर्यंत २४ तासांमध्ये वर्धा येथे राज्यातील उच्चांकी ३५.४ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. अनेक ठिकाणी कमाल तापमानाचा पारा अद्यापही ३० अंशांच्या वरच स्थिरावला असल्याचे दिसून येते.
पूर्व विदर्भातील गोंदिया, चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यांत जोरदार सरी कोसळल्याने गडचिरोली येथे उच्चांकी ९० मिलिमीटर पावसाची नोंद झाली. राज्यात आजपासून (ता. २६) पावसाचा जोर वाढण्याचा अंदाज आहे. राज्यात विविध ठिकाणी विजांसह पावसाची शक्यता असल्याने सतर्कतेचा इशारा (येलो अलर्ट) हवामान विभागाने वर्तविला आहे.
गुरुवारी (ता. २५) सकाळी ८.३० वाजेपर्यंतच्या २४ तासांमध्ये नोंदले गेलेले तापमान (अंश सेल्सिअसमध्ये) :
ठिकाणे---तापमान कमाल---तापमान किमान
पुणे---२९.६---१९.६
अहिल्यानगर---२७.८---१९.५
धुळे---३२.०---१८.६
जळगाव---३२.०---२२.२
मालेगाव---२९.४---१८.८
नाशिक---३०.१---१९.८
निफाड---२९.५---२२.८
रत्नागिरी---३०.१---२३.७