डिसेंबर महिन्यापासून राज्यातील वातावरणात अनेक बदल पाहायला मिळत आहेत. तर दरम्यान,गेल्या दोन ते तीन दिवसांपासून राज्यात कडाक्याची थंडी पडली असून राज्यात आता पुन्हा एकदा पाऊस पडण्याची शक्यता आहे. तसा अलर्ट हवामान विभागाने दिला आहे. राज्यात तुरळक ठिकाणी हलक्या पावसाची शक्यता असल्याचं हवामान विभागानं सांगितलंय.
10 जानेवारीला राज्यात तुरळक ठिकाणी ढगाळ वातावरण राहून हलक्या पावसाची शक्यता असल्याची माहिती हवामान विभागानं दिली आहे. त्याचबरोबर काही भागांत थंडीचा जोर कायम असणार आहे. मुंबई शहर आणि उपनगरात 10 जानेवारीला सकाळी धुके आणि नंतर निरभ्र आकाश असण्याची शक्यता आहे. मुंबईतील कमाल तापमान 32 अंश सेल्सिअस तर किमान तापमान 22 अंश सेल्सिअस इतकं असू शकतं. मुंबईतील किमान तापमानात वाढ झाल्याने मुंबईकरांना उकाडा जाणवण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे.
10 जानेवारीला पुण्यामध्ये सकाळी धुके आणि नंतर निरभ्र आकाश असण्याची शक्यता आहे. पुण्यातील कमाल तापमान 31 अंश सेल्सिअस तर किमान तापमान 12 अंश सेल्सिअस इतकं असल्याची माहिती हवामान विभागानं दिली आहे. पुढील काही दिवसांत पुण्यातील किमान तापमानात वाढ होण्याची शक्यता आहे.छत्रपती संभाजीनगरमध्ये 10 जानेवारीला सकाळी धुके आणि नंतर निरभ्र आकाश असण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. तर11 जानेवारीला छत्रपती संभाजीनगरमध्ये हलक्या पावसाची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे.
तसेच, उत्तर महाराष्ट्रातील प्रमुख शहर असलेल्या नाशिकमध्ये 10 जानेवारीला सामान्यतः ढगाळ आकाश राहून हलक्या पावसाची शक्यता असल्याची माहिती हवामान विभागानं दिली आहे. नाशिकमधील कमाल तापमान 30 अंश सेल्सिअस तर किमान तापमान 13 अंश सेल्सिअस इतके असण्याची शक्यता आहे. 11 जानेवारीला सुद्धा नाशिकमध्ये पावसाची शक्यता असल्याची माहिती हवामान विभागानं दिली आहे.