भारतीय हवामान विभाग कडून 2025 च्या मान्सून हंगामाबाबत मोठं भाकीत वर्तवण्यात आलं आहे. आयएमडीनं मान्सून संदर्भात दिलासादायक बातमी दिली आहे.
भारतीय हवामान विभागाचे प्रमुख डॉ. मृत्युंजय महापात्रा यांनी वर्तवलेल्या अंदाजानुसार यावर्षी देशात सरासरीपेक्षा अधिक पाऊस होण्याची शक्यता आहे. जूनमध्ये भारतात मान्सूनच आगमन होईल, तर सप्टेंबरमध्ये परतीच्या पावसाला सुरुवात होणार आहे. या काळात देशभरात सरासरी मान्सूनचं प्रमाण 103 टक्के ते 105 टक्के राहण्याची शक्यता आहे.
हवामान विभागानं वर्तवलेला हा अंदाज खरा ठरल्यास हा शेतकऱ्यांसाठी मोठा दिलासा ठरणार आहे. यावर्षी मान्सून वेळेपूर्वीच भारतामध्ये दाखल होण्याची शक्यता आहे. सामान्यपणे 15 जूनपर्यंत मान्सून संपूर्ण देश व्यापतो. मात्र यंदा वेळेपूर्वीच देशात मान्सूनचं आगमन होऊ शकतं असा हवामान विभागाचा अंदाज आहे.
कोणत्या महिन्यात किती पावसाची शक्यता?
जून महिन्यांमध्ये मान्सून संपूर्ण देश व्यापण्याची शक्यता आहे. जूनमध्ये मान्सूनचं प्रमाण सरासरी 165.3 मिलीमिटर इतंक राहाण्याचा अंदाज आहे. अर्थात जून महिन्यात सरासरीच्या 96 टक्के इतका पाऊस होऊ शकतो. जूनमध्ये कोकण, गोवा, आणि समुद्र किनारी भागांमध्ये सरासरीपेक्षा अधिक पावसाची शक्यता आहे.
जुलै महिन्यात पावसाचं प्रमाण वाढणार असून, या महिन्यात सरासरीच्या तुलनेत 102 टक्के इतका पाऊस पडू शकतो. ऑगस्ट महिन्यामध्ये 108 टक्के तर सप्टेंबरमध्ये 104 टक्के इतक्या पावसाचा अंदाज आहे.
हवामान विभागानं वर्तवलेल्या अंदाजानुसार या वर्षी दिल्ली, उत्तर प्रदेश, पंजाब, राजस्थान, मध्य प्रदेश, महाराष्ट्र, गुजरात, ओडिशा, छत्तीसगड, आणि पश्चिम बंगाल या राज्यांमध्ये चांगला पाऊस पडण्याची शक्यता आहे. तर दुसरीकडे केरळ, आंध्र प्रदेश, तामिळनाडू, बिहार, कर्नाटक, जम्मू काश्मीर आणि लडाख या राज्यांमध्ये यंदा सरासरीपेक्षा कमी पाऊस पडण्याचा अंदाज असल्यानं चिंता वाढली आहे.
यंदा जरी पावसाचं प्रमाण हे सरासरीपेक्षा अधिक राहणार असलं तरी देखील ते असमान राहण्याची शक्यता आहे. काही राज्यांमध्ये चांगला पाऊस पडण्याची शक्यता आहे, तर काही राज्यांमध्ये कमी पावसाची शक्यात आहे. महाराष्ट्रात यंदा चांगल्या पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.