गेल्या काही दिवसांपासून मुंबईला पावसाने थैमान घातले आहे. त्यात काही येत्या काही तासात मुंबईला अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. भारतीय हवामान खात्याने आज बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रासाठी (मुंबई शहर व उपनगरे) अतिमुसळधार पावसाचा रेड अलर्ट जाहीर केला आहे. शहरात सकाळ पासूनच मुसळधार पाऊस सुरू असून, ठिकठिकाणी पाणी साचण्याची शक्यता लक्षात घेता मुंबई महानगरपालिकेकडून महत्वाचा निर्णय घेण्यात आला आहे.
बृहन्मुंबई महानगरपालिका (BMC) तर्फे जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण म्हणून जाहीर करण्यात आलेल्या आदेशानुसार, मुंबईतील सर्व शासकीय, निमशासकीय तसेच महापालिका कार्यालयांना आज सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. मात्र, अत्यावश्यक सेवा सुरू राहणार आहेत. महापालिकेने यासोबतच खाजगी कार्यालयांनाही सुट्टी जाहीर करण्याच्या सूचना दिल्या आहेत.
मात्र अत्यावश्यक कारणास्तव काम सुरु ठेवायचे असल्यास वर्क फ्रॉम होमचा पर्याय वापरण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. नागरिकांची गैरसोय होऊ नये आणि सुरक्षिततेच्या दृष्टीने हा निर्णय घेण्यात आला असून, संबंधित कार्यालयांनी महापालिकेच्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन करण्यात आले आहे. अनावश्यक प्रवास टाळावा, सुरक्षिततेसाठी घरात राहावे, असे आवाहन बीएमसीकडून करण्यात आले आहे.