'मोंथा' चक्रीवादळ निवळल्यानंतर कमी दाबाचे क्षेत्र मध्य प्रदेशाकडे सरकत आहे. त्यामुळे राज्यातील काही भागात पावसाला पोषक हवामान आहे. ऑक्टोबर अखेर पश्चिम महाराष्ट्रातील हवामानात मात्र मोठे बदल जाणवत आहेत. आज ३१ ऑक्टोबर रोजी उत्तर कोकण, उत्तर महाराष्ट्र, विदर्भात विजांसह पावसाची शक्यता आहे.
आज सकाळी मुंबईसह उपनगरात पासने दमदार हजेरी लावली. सकाळच्या सुमारास अचानक आलेल्या पावसाने कामावर जाणाऱ्या नोकरदार वर्गाची चांगलीच तारांबळ उडाली आहे. मुंबईसह आज कोकणातील रायगड जिल्ह्यात जोरदार पावसाचा, तर पालघर, नंदूरबार, धुळे, जळगाव, नाशिक, छत्रपती संभाजीनगर, अमरावती, नागपूर, भंडारा, पुणे , गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली या जिल्ह्यांत विजांसह पावसाचा अंदाज असल्याने हवामान खात्याने येलो अलर्ट दिला आहे.
उर्वरित राज्यात अंशतः ढगाळ हवामानासह, हलक्या पावसाची, तसेच कमाल तापमानात चढ-उतार होण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. दरम्यान हवामानात होणाऱ्या चढउताराने ताप, सर्दी, खोकला सारखे आजार डोकं वर काढत आहेत. हवामान खात्याने सांगितल्यानुसार, आजचा संपूर्ण दिवस महत्त्वाचा असून राज्यात ऊन पावसाचा लपंडाव कायम राहणार आहे.