देशातून माघार घेणारा पाऊस सध्या महाराष्ट्रात मात्र धुमाकूळ घालताना दिसत आहे. मराठवाड्यात पावसाने प्रचंड कहर केला आहे. यामुळे शेतीपिकांचे मोठे नुकसान झाले असून जनजीवन देखील विस्कळीत झाले आहे. येत्या काही दिवसांत राज्यातील अनेक भागांत मुसळधार पाऊस सुरूच राहणार, असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि कोकणातील काही जिल्ह्यांना भारतीय हवामान विभागाने मुसळधार पावसाचा इशारा जारी केला आहे.
राज्यावर असणारं हे अस्मानी संकट पाहता हवामान विभागानं पुढील २४ तासांसाठी २९ जिल्ह्यांमध्ये पावसाचा हाय अलर्टचा इशारा दिला आहे. हवामान विभागाच्या मुंबई शाखेच्या माहितीनुसार मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस, वादळी वाऱ्यांची शक्यता वर्तवण्यात आली आहे. यादरम्यान वाऱ्याचा वेग ताशी 40 - 50 किमी इतका असेल असं म्हणत नागरिकांना सावधही करण्यात आलं आहे.
उत्तर कोकणामध्ये मात्र मेघगर्जना आणि वादळी वाऱ्यांसह पावसाची हजेरी असेल असा इशारा हवामान विभागानं जारी केला आहे. कोकणातील सिंधुदुर्ग सोडता मुंबई, ठाणे, रायगड, रत्नागिरी आणि पालघर या जिल्ह्यांसाठी हवामान विभागाने यलो अलर्ट दिला आहे.
पश्चिम महाराष्ट्रातील सर्व पाच जिल्ह्यांसाठी हवामान विभागाने यलो अलर्ट दिला आहे. पुणे, सातारा, सांगली, सोलापूर आणि कोल्हापूर या जिल्ह्यांतील अनेक भागांत जोरदार तर काही ठिकाणी अतिवृष्टीची शक्यता हवामान खात्याने व्यक्त केली आहे. याच कालावधीत वादळी वारे आणि विजांच्या कडकडाटाचीही शक्यता वर्तवण्यात आली आहे.
उत्तर महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांसाठी हवामान विभागाने यलो अलर्ट घोषित केला आहे. नाशिक, अहमदनगर, जळगाव, धुळे आणि नंदुरबार या जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.