दैनिक भ्रमर : मुंबईत होणाऱ्या मुसळधार पावसाने जनजीवन विस्कळीत झाले आहे. हवामानखात्याकडून आज रेड अलर्टचा इशारा मुंबईला देण्यात आला आहे. याच मुसळधार पावसाचा फटका लोकल सेवेला बसला असून ठाणे कडून मुंबई सीएसटीकडे जाणाऱ्या सर्व ट्रेन रद्द करण्यात आल्या आहेत. त्यामुळे फलाटावर मोठ्या प्रमाणात प्रवाशांची गर्दी झाल्याचे पहायला मिळत आहे.
मुंबई छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसकडे जाणारी लोकल सेवा ठप्प झाली आहे.फलाटावर या संदर्भात रेल्वेप्रशासनाकडून सूचना करण्यात येत आहे. रेल्वे सेवा सुरळीत करण्यात आल्यावर प्रशासनाकडून यासंदर्भात पुढील सूचना देण्यात येतील. लोकल सेवा पूर्णपणे ठप्प झाल्याने अनेक लोक हे ठाणे स्टेशनपर्यंत थांबले आहेत. काही एक्सप्रेस गाड्या सुद्धा रद्द झाल्या आहेत, तर काही उशिराने आहेत. त्यामुळे अनेक प्रवासी ठाणे स्टेशनवर बसून आहेत. पावसाचा जोर अद्यापही कमी होताना दिसून येत नसल्याने लोकल सेवा केव्हा सुरु होईल हे अद्याप स्पष्ट नाही.