आज मुंबईत एक भीषण रेल्वे अपघात झाला. यात 8 रेल्वे प्रवाशांनी आपले प्राण गमावले. कसाऱ्याहून सीएसएमटीच्या दिशेने जाणाऱ्या लोकलमधून पडून आठ प्रवाशांचा मृत्यू झाला. सकाळी नऊ वाजताच्या सुमारास ही दुर्देवी घटना घडली.
लोकलच्या दरवाजाला लटकलेले प्रवासी जवळून जाणाऱ्या एक्स्प्रेसला घासले गेले. त्यातून हा भीषण अपघात झाल्याची माहिती रेल्वे प्रशासनाने दिली. त्याशिवाय काही प्रवासी जखमी झाल्याची माहिती आहे. त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.
एका प्रवाशाने दिलेल्या माहितीनुसार, प्रवासी फुटबोर्डवरून प्रवास करत होते. एकमेकांना त्यांच्या बॅगा लागल्यामुळे किंवा इतर गोष्टीमुळे ते ट्रेनमधून पडले असावेत.
या भीषण अपघाताच्या पार्श्वभूमीवर आता रेल्वे बोर्डाने निर्णय घेतला आहे. पहिला निर्णय म्हणजे नवीन येणाऱ्या गाड्या या ऑटोमॅटिक डोअर क्लोजरसोबत असतील. 238 एसी लोकल मुंबई सबर्बनसाठी घेतल्या आहेत. ज्या गाड्या घेतल्या आहेत, त्या ऑटोमॅटिक डोअर क्लोजर सिस्टिमने येणार आहेत.
दुसरा निर्णय असा आहे की, आयसीएफद्वारे एक्झिस्टिंग लोकलला रेट्रो फिकमेंटच्या माध्यमातून दरवाजे बंद करण्याची सिस्टिम लावणार आहोत. असा निर्णय आता घेतला आहे. पुन्हा अशा घटना घडू नये म्हणून आपोआप दरवाजा बंद होणाऱ्या ट्रेन रेल्वेच्या सेवेत असणार आहे.