मोबाईल फोन हातात घेऊन , लोकलच्या दारात उभे राहून प्रवास करणे पडले महागात!
मोबाईल फोन हातात घेऊन , लोकलच्या दारात उभे राहून प्रवास करणे पडले महागात!
img
Dipali Ghadwaje
लोकलच्या दारात उभे राहून प्रवास करणाऱ्यांवर फटका गँगची नजर असते. चोरटे लोकलच्या दारात उभे राहून प्रवास करणाऱ्यांचा फायदा घेत मोबाईल फोन लंपास करतात. पण, फटका गँगची ही चोरीची पद्धत अनेक प्रवाशांसाठी जीवघेणी ठरते. अनेक प्रवाशांना यामुळे अपंगत्व आलं असून काहींना जीवही गमवावा लागला आहे. असाच एक प्रकार दिवा स्थानकात समोर आला आहे.

लोकल ट्रेनमध्ये मोबाईल चोरीच्या घटना ऐकायला मिळतात, त्यातच फटका गँगच्या अनेक घटना अधूनमधून समोर येत असतात. ठाण्यामध्ये पुन्हा एकदा फटका गँगचं प्रकरण समोर आलं आहे. फटका गँगमुळे एका 22 वर्षीय तरुणाला कायमचं अपंगत्व आलं आहे. फटका गँगमुळे तरुणाला एक हात गमवावा लागला आहे. या तरुणाला खांद्यापासून हात गमवावा लागला आहे. 

दिवा रेल्वे स्थानक येथून प्रवास करत असताना लोकलच्या दारात उभे राहून मोबाईल फोन हातात घेऊन प्रवास करणे एका प्रवाशाला चांगलेच महागात पडले आहे. फटका गँगमुळे या प्रवाशाने आपला हात गमवावा लागल्याची घटना समोर आली आहे. 

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, दिवा रेल्वे स्थानकातून फलाट क्रमांक दोन वरून रविवारी रात्री 11:56 मिनिटांनी ठाण्याच्या दिशेने ट्रेन रवाना होताच दिवा रेल्वे स्थानकात एका चोरट्याने शशिकांत कुमार यांच्या मोबाईलवर हात मारला. शशिकांत दारात उभा असल्या कारणाने त्याचा तोल जाऊन शशिकांत कुमार खाली पडला असताना त्यांचा डावा हात रेल्वे आणि रुळाच्या संपर्कात आल्याने संपूर्ण डावा हात त्यांना खांद्यापासून गमवावा लागला आहे.

या घटनेनंतर रेल्वे पोलिसांच्या साह्याने शशिकांत कुमार याला वैद्यकीय उपचाराकरिता रुग्णालयात हलवले. पोलिसांनी गणेश शिंदे या 29 वर्षीय व्यक्तीला अटक केली आहे. पण या घटनेनंतर अशा घटना वारंवार घडू नयेत म्हणून रेल्वे पोलीस प्रशासन कोणती ठोस पाऊले उचलतील याकडे सर्व प्रवाशांचे लक्ष लागलं आहे.

इतर बातम्या
Join Whatsapp Group