दैनिक भ्रमर : देशात रोज कुठल्या ना कुठल्या कोपऱ्यातून भयानक घटना समोर येत आहेत. तेलंगणाची राजधानी असलेल्या हैदराबाद शहरातूनही अशीच एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका पतीने आपल्या 5 महिन्यांच्या गर्भवती पत्नीची अमानुषपणे हत्या केली. यानंतर त्याने तिच्या मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी तिच्या शरीराचे तुकडे केले आणि त्यातील तीन तुकडे नदीत टाकून दिले. ही घटना उघड झाल्यानंतर हैदराबादमध्ये एकच खळबळ उडाली आहे.
तेलंगणातील हैदराबादमध्ये ही धक्कादायक घटना उघडकीस आली आहे, प्रेम विवाहाचा भीषण अंत पाहून संपूर्ण देश पुन्हा एकदा हादरला आहे. मेडिपल्लीच्या बालाजी हिल्स उपनगरात महेंद्रने त्याच्या २१ वर्षीय गर्भवती पत्नी बी. स्वातीची हत्या केली. धक्कादायक म्हणजे त्यानंतर त्याने तिच्या शरीराचे अवयव नदीत फेकले आणि तिचे धड घरामध्ये लपवून ठेवले.
नेमकं काय घडलं ?
महेंद्र आणि बी. स्वाती यांचा प्रेमविवाह झाला होता. त्यांनी २० जानेवारी २०२४ रोजी कुकटपल्ली येथील आर्य समाजात प्रेम विवाह केला होता. सुरुवातीचे दिवस आनंदात गेले, पण लवकरच घरगुती वाद आणि संशयामुळे त्यांच्या नात्यात कटुता आली. धक्कादायक म्हणजे एप्रिल २०२४ मध्ये स्वातीने विकाराबाद पोलिसांकडे पतीविरोधात हुंडाबळीची तक्रारही केली होती. गावातील पंचायतीमध्ये ते प्रकरण सोडवण्यात आलं. मात्र महेंद्रच्या मनातील संशय वाढतच गेला.
हे ही वाचा
स्वाती पाच महिन्यांची गर्भवती असतानाही दांपत्यात भांडणे सुरूच होती. २२ ऑगस्ट २०२५ रोजी स्वातीने माहेरी जाणार असल्याचे महेंद्रला सांगितले. ते ऐकून महेंद्र संतापला. त्याने २३ ऑगस्ट रोजी पत्नीचा गळा दाबून खून केला. त्यानंतर हत्या आणि पुरावे नष्ट करण्यासाठी त्याने मृतदेहाचे कुऱ्हाडीने तुकडे करून डोके, हात, पाय नदीत फेकले, तर धड आपल्या खोलीत लपवून ठेवले.
हे ही वाचा
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीने आधीच मुसी नदीत डोके, हात आणि पाय फेकून दिले होते, तर महिलेचे धड त्याच्या घरातून सापडले आहे. पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले आहे आणि त्याची चौकशी सुरू आहे. फॉरेन्सिक टीमने महिलेच्या धडावरून पुरावे गोळा केले आहेत आणि ओळख पटविण्यासाठी डीएनए चाचणी केली जाईल.