पैशांचा मोह माणसाला किती थराला नेऊ शकतो, याचे एक अत्यंत भीषण आणि सुन्न करणारे उदाहरण हरियाणातील करनाल जिल्ह्यात समोर आले आहे. येथील असंध भागात राहणार्या वृद्ध दाम्पत्याची हत्या करणारा दुसरा तिसरा कोणी नसून त्यांचा लाडका नातूच असल्याचे निष्पन्न झाले आहे.
रविंद्र नावाच्या या नराधम नातवाने आपल्या आजी-आजोबांची अतिशय क्रूरपणे हत्या केली. मात्र, मृत्यूच्या दारात उभ्या असलेल्या आजीने घेतलेला एक चावा या संपूर्ण हत्याकांडाचा सर्वात मोठा पुरावा ठरला.
हरि सिंह आणि त्यांची पत्नी लीला या वृद्ध दाम्पत्याची रात्री घरात घुसून हत्या करण्यात आली होती. सुरुवातीला हा प्रकार लुटमारीचा वाटत होता. स्वतः नातू रविंद्र प्रसारमाध्यमांसमोर येऊन घरात लूट झाली असे रडण्याचे नाटक करत होता. पण त्याच्या हाताच्या बोटाला असलेल्या एका पट्टीने पोलिसांचे लक्ष वेधले. जेव्हा पोलिसांनी त्याला विचारले, तेव्हा त्याने लाकूड कापताना जखम झाली असे उत्तर दिले.
मात्र, घटनास्थळी असे कोणतेही खुणा न आढळल्याने पोलिसांचा संशय बळावला. पोलिसांनी जेव्हा कसून चौकशी केली, तेव्हा रविंद्रने गुन्हा कबूल केला. त्याने सांगितले की, जेव्हा तो आजीच्या तोंडावर चिकटपट्टी लावत होता, तेव्हा जीव वाचवण्यासाठी धडपडणार्या आजीने त्याच्या बोटाचा जोरात चावा घेतला होता. आजीने दिलेली ही जखम रविंद्रसाठी फास ठरली. मरता मरता आजीने आपल्या मारेकर्याची ओळख आपल्या दातांच्या निशाणीने पोलिसांसमोर उघड केली.