अहिल्यानगर शहरातील बोल्हेगाव परिसरात राहणार्या मनिषा शिंदे यांचा शुक्रवारी त्यांच्याच राहत्या घरात धारदार शस्त्राने गळ्यावर वार करून खून केल्याची घटना समोर आली होती. या घटनेनंतर तोफखाना पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला. दरम्यान स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी तपास करत चार युवतींना अटक केली आहे. त्यातून, पोलीस तपासात धक्कादायक माहिती समोर आली.
मयत महिलेच्या शेजारी माहेर असलेल्या दिव्या अंकुश देशमुख ऊर्फ दिव्या विजय खाडे या (20) वर्षीय युवतीनेचं या खुनाचा कट रचल्याचे उघड झाले. कारण, तिला मयत महिलेच्या दागिन्यांची माहिती होती. त्याच माहितीच्या आधारे तिने आपल्या तीन साथीदार महिलांना सोबत घेऊन चोरीचा डाव आखला. मात्र, या चोरीच्या डावात चार जणींनी एकत्र येत 40 वर्षीय महिलेचा खून केला.
पोलीस तपासादरम्यान आरोपींनी दिलेल्या कबुलीनुसार, दिव्या देशमुख आणि तिच्या साथीदारांनी मयत महिलेच्या घरात प्रवेश करून गळ्यातील दागिने बळजबरीने काढण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्या महिलेने आरडाओरड सुरु केल्याने जवळच असलेल्या ब्लेडने गळ्यावर वार करून तिचा खून केल्याची धक्कादायक माहिती तपासात समोर आली. याप्रकरणी, पोलिसांनी दिव्या खाडे,अंजुम सैफी आणि दोन अल्पवयीन मुलींना अटक केली आहे. या घटनेनं एकच खळबळ उडाली आहे.