संशयाने कित्येक घरं , कुटुंब उद्धवस्त झालेली आहे. फक्त कानाने ऐकलेल्या गोष्टीवर विश्वास ठेऊन , त्याची सत्यता न तपासता अनेक नाती संपुष्टात आली आहे. गडचिरोली जिल्हात देखील फक्त चारित्र्याच्या संश्यावरून कुटुंब उघड्यावर पडले आहे. धानोरा तालुक्यातील दुर्गम भागातील रोपीनगट्टा येथे चारित्र्याच्या संशयातून पतीने पत्नीची दगडावर डोके ठेचून निर्घृण हत्या केली आणि त्यानंतर स्वतःही विष प्राशन करून जीवनयात्रा संपविली.
या हृदयद्रावक घटनेमुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली असून, आई-वडिलांच्या या टोकाच्या पावलामुळे चार निरागस बालकांचे छत्र हरपले आहे. कनिष्ठा राकेश कुजूर (३२), राकेश सुकना कुजूर (३७, दोघे रा. रोपीनगट्टा) असे मृत दाम्पत्याचे नावे आहे.
पेंढरी पोलिस मदत केंद्रांतर्गत येणाऱ्या छत्तीसगड सीमेवरील शेवटच्या टोकावर असलेल्या रोपीनगट्टा गावात ५ जानेवारी रोजी राकेशच्या शेतातील धान मळणीचे काम आटोपले होते. मंगळवारी पती-पत्नी दोघेही शेतावर गेले होते. सोबत वडील आणि मुलगीही होती. दुपारी 'आम्ही घराकडे जातो' असे सांगून हे दाम्पत्य निघाले, मात्र ते घरी पोहोचलेच नाहीत.
७ जानेवारी रोजी गावाजवळील गागीरमेटा डोंगर परिसरात कनिष्ठाचा रक्ताने माखलेला मृतदेह आढळून आला. दगडावर डोके ठेचून तिची हत्या केल्याचे स्पष्ट झाले होते. दरम्यान, पती राकेश बेपत्ता असल्याने त्यानेच खून केल्याचा संशय बळावला होता. ८ जानेवारी रोजी राकेशचा मृतदेह त्याच्याच शेतात आढळून आला. पत्नीची हत्या केल्यानंतर पश्चात्तापातून तसेच अटकेच्या भीतीने त्याने विष पिऊन आत्महत्या केल्याचे समोर आले.
या घटनेने चार भावंडे जन्मदात्यांच्या प्रेमाला पारखे झाले. मानवी (१२), मेहमा (९), अर्णव (७) आणि शालिनी (५) अशी या भावंडांची नावे आहेत. यातील तीन मुले देऊळगाव येथील आश्रमशाळेत शिकत आहेत. आता या चारही भावंडांची जबाबदारी त्यांचे ८० वर्षीय वृद्ध आजोबा सुकणा कुजूर यांच्यावर येऊन पडली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, राकेश हा दारूच्या नशेत पत्नीवर नेहमी संशय घ्यायचा. त्यांच्यातील वाद विकोपाला गेल्यामुळे ऑगस्ट महिन्यात गावात बैठक बोलावून राकेशला समज देण्यात आली होती. काही दिवस तो शांत होता, मात्र संशयाचे भूत पुन्हा डोक्यात शिरल्याने एका हसत्या खेळते कुटुंब उद्ध्वस्त झाले.