धाराशिव जिल्ह्यातुन एक खळबळजनक घटना समोर आली आहे. रविवारी पहाटेच्या सुमारासएका इसामाचा धारदार हत्यार दगडाने ठेचून अत्यंत निर्दयीपणे खून करण्यात आला होता. उमरगा शहरातील बायपास लगतच्या कोरेगाववाडी रस्त्याच्या कडेला हा मृतदेह आढळून आला. यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली होती. याप्रकरणी पोलिसांनी आरोपीच्या मुसक्या आवळल्या आहेत. पोलीस तपासात ही हत्या अनैतिक संबंधांतून झाल्याचे निष्पन्न झाले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, रविवारी दिनांक ४ रोजी पहाटे सहाच्या सुमारास कोरेगाव रोड लगत एका इसमाचा मृतदेह छिन्नविच्छिन्न अवस्थेत नागरिकांना दिसला. मृतदेह हा शहरातील जुनीपेठ येथील शाहूराज महादू सूर्यवंशी यांचा असल्याची ओळख पटल्यानंतर पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवत २४ तासात खुनाचा उलगडा केला.
मृत शाहूराज यांची पत्नी यांची सखोल चौकशी केली असता तिचे त्रिकोळी येथील शिवाजी दत्तू दूधनाळे यांच्यासोबत अनैतिक संबंध असल्याचं उघडं झालं.शाहूराज यांची पत्नी आणि आरोपी शिवाजी दत्तू दूधनाळे यांच्यात गेल्या एक ते दीड वर्षांपासून अनैतिक संबंध होते. यामुळे मृत शाहूराज आणि त्याची गौरी यांच्यात सतत भांडण होत होती.याच कारणातून हा खून झाल्याचे स्पष्ट झाल्यानंतर पोलिसांनी सोमवारी पहाटेच्या सुमारास त्रिकोळी येथील आरोपी शिवाजी दत्तू दूधनाळे यांना ताब्यात घेतले.
आपल्या संबंधांत अडथळा ठरत असल्याने मृताची पत्नी आणि तिच्या प्रियकराने शाहूराजचा कायमचा काटा काढण्याचं ठरवलं. आरोपी शिवाजी आणि गौरी यांनी संगनमताने रविवारी पहाटे हत्येचा कट रचला. आरोपी शिवाजी याने मृत शाहूराज याला रविवारी दारू पाजली. त्यानंतर रात्री दोन वाजण्याच्या सुमारास बायपास जवळच्या कोरेगाववाडी येथील रस्त्यावर नेऊन शाहूराजच्या डोळ्यात मिरची पावडर घालून त्याला रस्त्यावर पाडलं. नंतर संधी साधून आरोपी शिवाजीने शाहूराजच्या डोक्यात हंटर आणि दगडाने जबर मारहाण केली. यात शाहूराज सूर्यवंशी यांचा जागीच मृत्यू झाला असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. आरोपींनी या गुन्ह्याची कबुली दिली असून पोलीस पुढील तपास करत आहेत.