कर्नाटक राज्यातील बेळगावी येथी चिकोडी शहरात एक खळबळजनक घटना समोर आली आहे. हृदयविकाराचा झटका आल्याचे सांगून मुलाचे अंत्यसंस्कार केले खरे पण वडिलांनीच मुलाचा गळा आवळून खून केल्याचा प्रकार समोर आला आहे. ३१ वर्षीय किरण ऊर्फ बाळासाहेब आलुरे असे हत्या झालेल्या मुलाचे नाव आहे. याप्रकरणी वडील निजगुणी आलुरे व त्याचा साथीदार हॉटेल मालक उस्मान मुल्ला याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार चिकोडी शहरातील इंदिरानगरातील रहिवासी किरण आलुरे याला गांजा व दारूचे व्यसन होते. त्यासाठी वडिलांकडे तो वारंवार पैशाची मागणी करायचा. याच त्याच्या सवयीला वडील वैतागले होते. हॉटेलमध्ये काम करणारे त्याचे वडील निजगुणी याने पैसे व गांजा देतो असे सांगून त्याला गाठले. रामनगर येथील सरकारी हॉस्टेलच्या मागे असलेल्या झुडपात तो नशेमध्ये बसला होता. यावेळी निजगणी याने नायलॉनच्या दोरीने त्याचा गळा आवळून खून केला. त्यानंतर हॉटेल मालक उस्मान मुल्ला याच्या मदतीने त्याच्या गाडीतून मृतदेह तेथून हलविला.
रात्री 11 च्यादरम्यान किरणच्या मित्रांना फोन करून माझ्या मुलाचा हृदयविकारानेे मृत्यू झाला आहे आणि तुम्ही सती मंदिर स्मशानभूमीत या, असे सांगितले. पण, त्यांनी किरण अविवाहित असल्याने विधीसाठी घरी घेऊन येण्याची मागणी केली. पण, निजगुणी याने त्याला नकार दिला.शेवटी त्याच्या मित्रांनी स्मशानभूमीत धाव घेऊन मृतदेह पाहिला असता गळ्यावर व्रण दिसून आल्याने त्यांना संशय आला. पण, वडिलांनी गडबडीत अंत्यसंस्कार पार पाडले. अंत्यसंस्कार पार पडल्यानंतर त्याच्या मित्रांनी हॉटेल मालकाकडे किरणचा मृत्यू कशामुळे झाला, याची चौकशी केली. पण, त्याने उडवाउडवी उत्तरे दिली.
त्यानंतर हॉटेल मालकाला किरणच्या वडिलांना फोन करण्यास सांगितल्यानंतर फोनवर दोघांमध्ये खून केल्याविषयी बोलणे झाले. रक्षाविसर्जनादिवशी त्या तरुणांनी किरणच्या वडिलांवर दबाव घालत विचारणा केली असता आपणच खून केल्याचे त्याने कबूल केले. त्याचा कबुलीजबाब त्यांनी मोबाईलमध्ये चित्रीत केला. त्यानंतर त्या तरुणांनी वडील निजगुणी व त्याचा मित्र उस्मान मुल्ला याला चिकोडी पोलिसांच्या ताब्यात दिले आहे. याप्रकरणी चिकोडी पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.