उत्तर प्रदेशच्या सहारनपूरच्या गावातून एक धक्कादायक घटना उघडकीस आली. डोक्यात गोळ्या झाडून एकाच कुटूंबातील पाच जणांची हत्या करण्यात आली आहे. या घटनेने संपूर्ण गावात खळबळ उडाली आहे. मात्र ही हत्या की आत्महत्या हे अद्याप अस्पष्ट आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, एका अशोक नावाच्या व्यक्तीच्या घरात ५ जणांचे मृतदेह आढळले. पाचही जण एकाच कुटुंबाचे सदस्य होते. मीन अशोक (४०),पत्नी अंजिता (३७), आई विद्यावती (७०), दोन मुले कार्तिक(१६)-देव (१३) अशी मृतांची ओळख समोर आली आहे. अशोक आणि त्यांची पत्नी अंजिताचं मृतदेह फरशीवर आढळला. विद्यावती आणि दोन्ही मुलांचे मृतदेह बेडवर आढळले. पाचही जणांचे मृतदेह एकाच खोलीत आढळले.
या पाचही जणांची डोक्यात गोळ्या झाडून हत्या केल्याचे प्राथमिक माहितीतून समोर आलं आहे. पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून तपास सुरू केला आहे. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवण्यात आले आहे. पोलिसांनी नातेवाईकांना गोळ्या झाडून व्यक्तीने आत्महत्या केल्याचा संशय व्यक्त केला आहे. अशोक यांनी आई-बायको आणि मुलांना गोळ्या झाडून स्वत:वर गोळी झाडून आत्महत्या केल्याचा पोलिसांना संशय आहे. पंरतु पोलीस हे हत्या आणि आत्महत्या या दोन्ही बाजूने तपास करत आहेत. या घटनेने संपूर्ण गावात खळबळ उडाली आहे.
माहितीनुसार, अशोक हे कर्जबाजारी झाले होते. या कर्जावरून त्यांच्या घरात वाद व्हायचे. या मानसिक तणावातून अशोक यांनी टोकाचं पाऊल उचलल्याचं बोललं जात आहे. त्याचबरोबर कुटुंबाबाहेर व्यक्तीने येऊन पाच जणांची हत्या केल्याचाही संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. पोलीस दोन्ही बाजूने तपास करत आहेत.