राजस्थानच्या श्रीगंगानगरमध्ये खळबळजनक घटना घडली आहे. पती आणि पत्नीच्या नात्याला काळीमा फासणारीच ही घटना. एका महिलेने तीन महिन्यांतच तिच्या पतीची हत्या घडवून आणली आहे. ही हत्या नसून अपघात आहे असंही भासवण्याचा प्रयत्न केला आहे. सोनम रघुवंशी प्रकरणाची आठवण काढत नेटकरी या प्रकरणाला Honeymoon Murder 2.0 असं म्हणत आहेत.
30 जानेवारीच्या संध्याकाळी या घटनेची सुरुवात झाली. राजस्थानमधील श्रीगंगानगर भागात आशिष आणि अंजू हे नवविवाहित जोडपं रात्री जेवण झाल्यानंतर शतपावली करण्यासाठी बाहेर पडलं. दरम्यान एका भरधाव वाहनानं आशिषला जोरदार धडक दिली. आशिष रक्ताच्या थारोळ्यात पडला आणि त्याचा जागीच मृत्यू झाला. अंजू देखील रस्त्यावर बेशुद्ध अवस्थेत सापडली.
पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली तेव्हा अंजूनं सांगितलं की, एका अज्ञात वाहनानं त्यांना धडक दिली आणि त्यासोबतच तिचे सोन्याचे दागिनेही लुटून नेले. श्रीगंगानगरच्या पोलीस अधीक्षक अमृता दुहान यांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला. सुरुवातीला हा हिट अँड रनचा आणि चोरीचा प्रकार वाटत होता. मात्र, फॉरेन्सिक टीमनं जेव्हा तांत्रिक तपास केला, तेव्हा काही गोष्टी खटकू लागल्या.
आशिषच्या शरीरावर केवळ अपघाताच्याच खुणा नव्हत्या, तर त्याच्या गळ्यावर फास दिल्याचे निशाणही दिसत होते. दुसरीकडे, अंजूच्या अंगावर साधी ओरखडाही नव्हती, जी अशा भीषण अपघातात शक्य नव्हती. अंजू वारंवार आपले जबाब बदलत होती, ज्यामुळे पोलिसांचा संशय बळावलाअंजूच्या फोन रेकॉर्डची तपासणी केली असता धक्कादायक माहिती समोर आली.
तिचं लग्नानंतरही संजू नावाच्या तिच्या जुन्या प्रियकराशी बोलणं सुरू होतं. अंजूचं लग्न 3 महिन्यांपूर्वी आशिषशी झालं होतं, पण ती या लग्नामुळे खुश नव्हती. लग्नानंतर ती काही दिवस माहेरी गेली होती आणि तिथेच तिनं संजूला भेटून आशिषला संपवण्याचा कट रचला. 30 जानेवारीच्या रात्री अंजू मुद्दाम आशिषला एका निर्जन रस्त्यावर घेऊन गेली. तिथे संजू आणि त्याचे दोन साथीदार रॉकी आणि बादल आधीच झाडाझुडपात लपून बसले होते.योजन केल्याप्रमाणे, त्या तिघांनी आशिषवर निर्घृण हल्ला केला आणि त्याचा गळा दाबून खून केला.
हा प्रकार अपघाती वाटावा म्हणून त्यांनी आशिषला वाहनानं धडक दिल्याचं भासवले. या कटाचा भाग म्हणून अंजूनं स्वतःचे दागिने आणि फोन त्या आरोपींकडे दिले, जेणेकरून पोलिसांना वाटेल की ही लूटमारीची घटना आहे. हल्ला झाल्यानंतर अंजू तिथेच बेशुद्ध पडल्याचं नाटक करत राहिली. मात्र, आशिषच्या शरीरावरील जखमांनी अंजूचा हा सर्व बनाव उघडा पाडला. पोलिसांनी आता अंजू, तिचा प्रियकर संजू आणि इतर दोन साथीदारांना अटक केली आहे.