'तू एक दिवस फ्रिजमध्ये सापडशील', फजलच्या छळाला कंटाळून स्तुतीची आत्महत्या
'तू एक दिवस फ्रिजमध्ये सापडशील', फजलच्या छळाला कंटाळून स्तुतीची आत्महत्या
img
वैष्णवी सांगळे
२०२२ मध्ये श्रद्धा वालकर हत्या प्रकरणाने संपूर्ण देश हादरला होता.  हे भीषण हत्याकांड दिल्लीत घडलं होतं, ज्यात २७ वर्षीय श्रद्धाची तिचा लिव्ह-इन पार्टनर आफताब पूनावाला याने गळा आवळून हत्या केली आणि मृतदेहाचे ३५ तुकडे केले. आफताब पूनावालाने मृतदेहाचे तुकडे करून ते फ्रिजमध्ये ठेवले आणि अनेक दिवस मध्यरात्री जंगलात फेकून पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न केला. या प्रकरणाने संपूर्ण देश हादरला होता आणि आता अशीच फ्रिजमध्ये टाकण्याची धमकी मुंबईतील एका डॉक्टर तरुणीला मिळाली. छळाला कंटाळून अखेर स्तुती बजरंग सोनवणे या डॉक्टर तरुणीने आत्महत्या केलीय. 

मुंबईतील अँटॉप हिल पोलीस ठाणे यांनी डॉ. स्तुती बजरंग सोनवणे यांना आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी फजल मोहम्मद खान (31) याला लोअर परळ येथून अटक केलीय. 8 मार्च रोजी या तरुणीने गळफास लावून आत्महत्या केली होती. न्यायालयाने फजल मोहम्मद खान याला एका दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे. त्याच्या चौकशीतून आता कोणती नवीन माहिती समोर येणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

पोलिसांना घटनास्थळावरून सहा पानांची सुसाईड नोट सापडली असून त्यात फैजल मोहम्मद खानकडून सतत मानसिक छळ होत असल्याचा उल्लेख आहे. फजलच्या छळाची माहिती स्तुतीने आपल्या मैत्रिणीला दिली होती. त्यात तिने “तू एक दिवस फ्रिज मध्ये सापडशील” असे वारंवार म्हणायचा, असे सांगितले होते. स्तुती सोनावणे आणि फजल खान यांची ओळख एका डेटिंग अ‍ॅपवरुन झाली. त्यानंतर ते गेल्या वर्षभरापासून रिलेशनशिपमध्ये होते. मात्र, या दोघांमध्ये भांडणे व्हायची. त्यावेळी फजल खान तिला मारुन टाकण्याची धमकी द्यायचा, असे पोलिसांचे म्हणणे आहे. 

या सगळ्या त्रासाला कंटाळून डॉ. स्तुती सोनवणे यांनी आत्महत्या केल्याचा प्राथमिक अंदाज आहे. 8 मार्च रोजी स्तुतीचे आई-वडील जेवण्यासाठी बाहेर गेले होते. हे दोघे घरी परत आल्यावर स्तुती तिच्या खोलीचा दरवाजा उघडत नव्हती. त्यावेळी स्तुतीच्या वडिलांनी खोलीचा दरवाजा तोडला असता स्तुतीने गळफास घेतल्याचे निदर्शनास आले. पोलिसांनी घटनास्थळी येऊन पंचनामा करुन स्तुती सोनावणे हिचा मृतदेह ताब्यात घेतला. शवविच्छेदन अहवालानुसार डॉ. स्तुती यांनी गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे स्पष्ट झाले आहे. या प्रकरणी अँटॉप हिल पोलिस अधिक तपास करत आहेत.


इतर बातम्या
Join Whatsapp Group