उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या अपघाती निधनाचा आघात झाल्यानं अवघा महाराष्ट्र एकीकडे शोकसागरात बुडाला असताना दुसरीकडे याच परिस्थितीचा गैरफायदा घेण्यात आला. अल्पसंख्याक मंत्री असलेल्या अजित पवारांच्या मृत्यूनंतर तातडीनं राज्यातील ७५ शिक्षण संस्थांना अल्पसंख्याक दर्जा दिल्याची धक्कादायक बाब समोर आली.
प्रत्येक फाईलमागे 25 लाखांची देवाण-घेवाण झाल्याचा आरोप आमदार रोहित पवारांनी केला. आता या प्रकरणात देवेंद्र फडणवीस यांनी गंभीर इशारा दिला आहे. अजित पवारांच्या निधनानंतर घाईगडबडीने ७५ शिक्षण संस्थांना अल्पसंख्यांक दर्जा देण्याचं प्रकरण अल्पसंख्याक विभागाच्या अधिकाऱ्यांच्या अंगलट येण्याची शक्यता आहे.
अल्पसंख्यांक विभागात ज्यांने कुणी गडबड केली आहे त्याच्यावर कारवाई केली जाणार असल्याचा इशारा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिला. ते मुंबईत माध्यमांशी बोलत होते. दरम्यान, राज्य अल्पसंख्याक आयोगाचे अध्यक्ष प्यारे खान यांना उपमुख्यमंत्री आणि अल्पसंख्याक मंत्री सुनेत्रा पवारांनी भेटीसाठी बोलावून घेतलं. यावेळी सुनेत्रा पवार यांनी अल्पसंख्याक संस्थानमध्ये सुरू असलेल्या भ्रष्टाचाराची माहिती घेतली आहे.