अभिनेता आमिर खानचा 3 इडियट्स हा चित्रपट आजही टीव्हीवर , मोबाईलवर आवर्जून पाहिला जातो. चित्रपटातील गाणी , डायलॉग्स , प्रसंग सर्व काही मनावर कोरलेलं आहे. चित्रपटाच्या शेवटी एक सिन आहे ज्यात अभिनेत्रीच्या बहिणीला प्रसूती वेदना सुरु होतात. त्या दिवशी शहरात खूप पाऊस पडत असतो. त्यामुळे रुग्णवाहिका येणं शक्य नसते.

यावेळी रँचो हा चित्रपटातील नायक हा डॉक्टर असलेल्या अभिनेत्रीसोबत व्हिडीओ कॉलद्वारे बोलून तिची प्रसूती करतो. असाच काहीसा प्रसंग मुंबईत घडला. धावती लोकल ट्रेन, गर्भवती महिलेला अचानक सुरु झालेल्या प्रसूती वेदना आणि मदतीसाठी कोणी नसताना धाडसी तरुणाने दाखवलेली हिंमत यामुळे एक गोंडस बाळ जन्माला आले आहे. मुंबईतील राम मंदिर या रेल्वे स्थानकात ही घटना घडली.
आमदार रोहित पवार यांच्या मतदारसंघातील एका तरूणानं डॉक्टर मैत्रिणीची व्हिडिओ कॉलद्वारे मदत घेऊन एका महिलेची रेल्वे स्थानक परिसरात प्रसुती केली आहे. आमदार रोहित पवार यांनी याचा व्हिडिओ समाज माध्यमांमध्ये शेअर केला आहे. समोर आलेल्या माहितीनुसार ही घटना मुंबईतील पश्चिम रेल्वे मार्गावरील राम मंदिर आणि गोरेगाव स्थानकादरम्यान घडली.
विकास बेंद्रे असे खऱ्या आयुष्यातील ‘रँचो’चं नाव आहे. हा तरूण आमदार रोहित पवार यांच्या कर्जत जामखेड मतदारसंघातील रहिवासी आहे. त्याच्या आयुष्यात एक अनपेक्षित प्रसंग आला. एका महिलेला अचानक प्रसूती वेदना सुरू झाल्या आणि परिस्थिती अत्यंत गंभीर झाली.
आजूबाजूला कुठेही डॉक्टर नव्हते. ॲम्बुलन्स मिळत नव्हती. अशा परिस्थितीत विकासने प्रसंगावधान राखत, एमर्जन्सी परिस्थितीला तोंड देण्याचं ठरवलं. त्याने लगेच आपल्या डॉक्टर मैत्रिणीला व्हिडिओ कॉल केला. त्या मैत्रिणीने पायरीपायरीने प्रसूती प्रक्रिया कशी करावी हे समजावलं, आणि विकासने नेमकं तसंच केलं.
या अत्यंत तणावपूर्ण क्षणी विकास बेद्रे यांनी अफाट धैर्य आणि समयसूचकता दाखवली. त्यांच्या या धाडसी प्रयत्नांना अखेर यश आले आणि राम मंदिर रेल्वे स्टेशनवर रात्री १:३० ते २:०० वाजण्याच्या सुमारात बाळाच्या रडण्याचा आवाज घुमू लगाला. त्या महिलेने एका गोंडस बाळाला जन्म दिला. बाळाचा जन्म सुखरूप झाल्यानंतर रेल्वे कर्मचारी आणि उपस्थित प्रवाशांनी सुटकेचा निःश्वास सोडला.
सध्या आई आणि बाळ दोघांचीही प्रकृती सुखरूप आहे.डॉक्टरच्या मार्गदर्शनाखाली, कोणताही वैद्यकीय अनुभव नसतानाही, तरुणाने मानवी धर्म पाळत आई आणि बाळाचे जीव वाचवले. सध्या या तरुणाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून सर्वत्र त्याचे कौतुक होत आहे.