राज्यातील २९ महानगपालिका निवडणुकांची रणधुमाळी आता शांत झाली असून काल (शुक्रवारी) निकाल जाहीर झाले. या निवडणुकीत अवघ्या देशाचे लक्ष लागलेल्या मुंबई महानगरपालिकेमध्ये ठाकरेंना मोठा धक्का बसला. गेली २५ वर्ष ठाकरेंची निर्विवाद सत्ता असलेली मुंबई महापालिका ठाकरेंच्या हातातून निसटली आणि भाजपच्या हाती लागली. या निकालानंतर ठाकरेंवर दुसरा आघात झाला असून शिवसेनेच्या पहिल्या महिला आमदार नीला देसाई यांचं दुःखद निधन झाले आहे.
नीला देसाई यांचे निधन झाले आहे. दुर्दैवी योगायोग म्हणजे मुंबई महापालिका निवडणुकांचे निकाल जाहीर झाले, त्याच रात्री देसाईंची प्राणज्योत मालवली. बाळासाहेब ठाकरेंच्या शिवसेनेच्या रणरागिणी अशी त्यांची राजकीय वर्तुळात ओळख होती. नीला देसाई यांच्या निधनाने कार्यकर्त्यांकडून हळहळ व्यक्त केली जात आहे.
शुक्रवारी हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने देसाई यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांना उपचारासाठी तातडीने रुग्णालयात नेण्यात आले, परंतु रात्री १० वाजण्याच्या सुमारास त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या पार्थिवावर शनिवारी दुपारी १२ वाजता अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
नीला देसाई कोण होत्या ?
नीला देसाई या शिवसेनेच्या जुन्या फळीतील नेत्या होत्या. सध्या त्या राजकारणात सक्रिय नव्हत्या. मात्र बाळासाहेब ठाकरे यांनी विश्वास दाखवत त्यांना संधी दिली आणि शिवसेनेकडून पहिल्या महिला आमदार होण्याचा मान नीला देसाई यांनी पटकवला होता. त्यांनी विधान परिषद सदस्य म्हणून काम केले होते.