गॅस सिलेंडरचा पाईप लीक होऊन कांदिवलीत भीषण स्फोट, ७ जण गंभीर ,प्रकृती चिंताजनक
गॅस सिलेंडरचा पाईप लीक होऊन कांदिवलीत भीषण स्फोट, ७ जण गंभीर ,प्रकृती चिंताजनक
img
दैनिक भ्रमर
मुंबईच्या कांदिवली परिसरात एक धक्कादायक घटना घडली आहे. कांदिवली पूर्वेला असणाऱ्या मिलिटरी रोडवरील राम किसन मेस्त्री चाळीत  बुधवारी सकाळी सिलेंडरचा स्फोट होऊन भीषण दुर्घटना झालीये. यामध्ये सात जण गंभीर जखमी झाले आहेत. या सगळ्यांची प्रकृती चिंताजनक आहे. 

मिळालेल्या माहितीनुसार, राम किसन मेस्त्री चाळीत आज सकाळी ९ वाजून ५ मिनिटांच्या सुमारास गॅसचा पाईप लीक झाल्यामुळे हा स्फोट झाला. या स्फोटानंतर घटनास्थळी आग लागली. आगीत सात जण भाजले असून त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सर्व जखमींवर ईएसआयसी रुग्णालय, डॉ.बाबासाहेब आंबेडकर रुग्णालय आणि कस्तुरबा रुग्णालयात उपचार सुरु आहेत. जखमींपैकी बहुतांश जण ८५ ते ९० टक्के भाजले आहेत. 

दरम्यान मुंबई अग्निशमन दलाने तत्काळ घटनास्थळी धाव घेत आग आटोक्यात आणली. ही आग ग्राउंड +१ मजल्याच्या दुकानात लागली होती. यात वीजजोडणी, एलपीजी गॅस सिलिंडर, रेग्युलेटर, गॅस स्टोव्ह यांना मोठ्या प्रमाणावर फटका बसला.

या स्फोटात शिवानी गांधी (वय 51), नितू गुप्ता (वय 31), जानकी गुप्ता (वय 39), मनराम कुमाकट ( वय 55), रसिका जोशी (वय 47),  दुर्गा गुप्ता (वय 30), पुनम (वय 28) हे सर्व गंभीर भाजले गेले आहेत. त्यांच्यावर सध्या उपचार सुरु आहेत. 
इतर बातम्या
Join Whatsapp Group