भीषण अग्नितांडव ! ४ मजली इमारतीला आग, २ तरुणांचा मृत्यू
भीषण अग्नितांडव ! ४ मजली इमारतीला आग, २ तरुणांचा मृत्यू
img
वैष्णवी सांगळे
मुंबईतील अंधेरी पूर्व भागात असलेल्या चांदिवली येथील एका व्यावसायिक इमारतीला बुधवारी सायंकाळी भीषण आग लागली. साकीविहार रोडवरील ‘नारायण प्लाझा’ इमारतीमधील टेक्स सेंटरमध्ये ही घटना घडली. या आगीत दोन जणांचा मृत्यू झाला असून इमारतीत मोठ्या प्रमाणावर धूर साचल्याने बचावकार्यात अडथळे आले होते. अग्निशमन दलाने दिलेल्या माहितीनुसार, ही आग लेव्हल १ ची होती. ३ तासांच्या प्रयत्नांनंतर अग्निशमन दलाने ही आग विझवली.

मिळालेल्या माहितीनुसार, अंधेरी पूर्वच्या चांदिवली परिसरातील साकी विहार रोडवरील नारायण प्लाझा या इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावरील एका कारखान्याला भीषण आग लागली. बुधवारी संध्याकाळी ६.३६ वाजता ही घटना घडली. मेसर्स निओसेल इंडस्ट्रीज (युनिट क्रमांक ३०३) येथील चार मजली इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावर आग लागली. आग संपूर्ण मजल्यावर वेगाने पसरत गेली आणि क्षणात सगळीकडे धूराचे लोट पसरले. बचाव कार्यादरम्यान अग्निशमन दलाच्या जवानांना कार्यालयात दोन तरुण बेशुद्ध अवस्थेत आढळून आले. दोघांनाही तातडीने रुग्णालयात नेण्यात आले.

भगवान पितळे (३० वर्षे) या तरुणाला सेव्हन हिल्स रुग्णालयात नेण्यात आले. तर सुमंत जाधव (२८ वर्षे) या तरुणाला राजावाडी रुग्णालयात नेण्यात आले. दोघांनाही डॉक्टरांनी मृत घोषीत केले. या आगीत कारखान्यातील इलेक्ट्रिकल वायरिंग, फर्निचर, लिथियम-आयन बॅटरी, ऑफिसच्या फाईल्स, लाकडी पार्टीशन आणि फॉल्स सीलिंग पूर्णपणे जळून खाक झाले.आग आटोक्यात आल्यानंतर, अग्निशमन दलाच्या जवानांनी कुलिंग ऑपरेशन सुरू केले जे रात्री उशिरापर्यंत सुरू होते. आगीचे कारण सध्या शोधले जात आहे. पण ही आग शॉर्ट सर्किटमुळे लागल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.
इतर बातम्या
Join Whatsapp Group