लाडक्या बहिणींच्या बँक खात्यात ३००० लवकरच जमा होणार, भाजप नेत्याची 'ती' एक पोस्ट अन चर्चांना उधाण
लाडक्या बहिणींच्या बँक खात्यात ३००० लवकरच जमा होणार, भाजप नेत्याची 'ती' एक पोस्ट अन चर्चांना उधाण
img
वैष्णवी सांगळे
महायुती सरकारची मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना गरीब गरजू महिलांना दर महिन्याला १५०० रुपये देते. राज्यातील लाडक्या बहिणींना नोव्हेंबरचा हप्ता मिळाला असून, डिसेंबर आणि जानेवारी या दोन महिन्यांच्या हप्त्यांची मात्र लाडक्या बहीणी प्रतीक्षा करत आहेत. १४ जानेवारीला मकरसंक्रांत साजरी होत असून, त्यानंतर लगेचच दुसऱ्या दिवशी महापालिका निवडणुकीसाठी मतदान होणार आहे.

त्यामुळे या कालावधीत लाडक्या बहिणींच्या खात्यात हप्त्याची रक्कम जमा होईल, अशी चर्चा सुरू होती. अशातच भाजप नेत्या तेजस्वी घोसळकर यांनी केलेल्या एका सोशल मीडिया पोस्टमुळे या चर्चेला अधिक बळ मिळाले आहे.मुंबईच्या वॉर्ड २ मधून निवडणूक लढवणाऱ्या भाजपच्या उमेदवार तेजस्वी घोसाळकर यांनी आपल्या सोशल मिडीयावर याबाबतची एक पोस्ट दोन दिवसांपूर्वी शेअर केली आहे. 

त्या पोस्टमध्ये त्यांनी म्हटलं आहे की, सण उत्साहाचा, क्षण मकर संक्रांतीचा.
मकर संक्रांतीचा गोडवा अधिक वाढवण्यासाठी महायुती सरकारने राज्यातील आपल्या लाडक्या बहिणींना मोठी भेट दिली आहे. 'मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण' योजनेअंतर्गत, डिसेंबर आणि जानेवारी या दोन्ही महिन्यांचा हप्ता एकत्रितपणे म्हणजेच ३००० रुपये, १४ जानेवारी पूर्वी सर्व पात्र भगिनींच्या खात्यात जमा होणार आहेत!
सण-उत्सवाच्या काळात आर्थिक बळ देऊन बहिणींच्या चेहऱ्यावर हसू फुलवण्याचे काम 'देवाभाऊ' आणि महायुती सरकारने केले आहे.

तर राज्यातील २९ महानगरपालिका निवडणुकीसाठी १५ जानेवारी रोजी मतदान आहे. तर, महायुतीतील दोन घटकपक्षांच्या उमेदवारांकडून त्यांच्या सोशल मिडीया अकाऊंटवरून येत्या १४ जानेवारीपूर्वी लाडक्या बहिणींच्या बँक खात्यात तीन हजार रुपये जमा होणार असल्याचा दावा केला जात आहे. सरकारकडून मकरसंक्रातींच्या दिवशी निधी वितरित करण्यात आला तर निवडणुकीच्या आचारसंहितेचा हा भंग नाही का असा सवाल विरोधकांकडून उपस्थित केला जात आहे.
इतर बातम्या
Join Whatsapp Group