लाडकी बहीण योजनाअंतर्गत राज्यातील पात्र महिलांच्या खात्यात १५०० रुपये पोहचले. त्यानंतर राज्य सरकारने आचारसंहितापूर्वी महिलांना भावनिक साद घातली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि महिला बालकल्याण मंत्री आदिती तटकरे यांची स्वाक्षरी असलेले एक भावनिक पत्र पाठवण्यात आलेय.
‘प्रिय ताई, या मदतीच्या मोबदल्यात मला काही नको, तुझा कष्टाळू हात माझ्या डोक्यावर असू दे’ असे आवाहन या पत्रातून ‘लाडक्या बहिणींना’ करण्यात आले आहे. पत्राच्या शेवटी, तुझा भाऊ 'एकनाथ', 'देवभाऊ', 'अजितदादा' आणि बहीण 'आदिती' अशा चौघांची स्वाक्षरी आहे.
विधानसभा निवडणुकांच्या तोंडावर ‘लाडक्या बहिणींना’ सरकारची भावनिक साद घालण्यात आली. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेतील पात्र महिलांना पत्र पाठविण्याचे राज्य सरकारकडून आदेश देण्यात आले. राज्यातील जिल्हा प्रशासनाला हे आदेश धाडण्यात आले असून आचारसंहिता जाहीर होण्यापूर्वी हे पत्र घरोघरी पोहचवण्याची मोहीम सुरु केली आहे. जिल्हा स्तरावरून मोहीम सुरू करण्यात आली आहे.
पत्रात नेमकं काय ?
पत्राची सुरुवात 'प्रिय ताई' अशी करण्यात आली आहे. या योजनेच्या माध्यमातून वर्षाला १८ हजार रुपये तुला मिळतील आणि राज्यातील एक कोटी ९६ लाखांपेक्षा अधिक भगिनींना या योजनेचा लाभ मिळाला, असे पत्रात म्हटले आहे. अडीच कोटी महिलांना हा लाभ मिळवून देण्याचा प्रयत्न असल्याचा दावा करण्यात आला. "माझे आयुष्य तुला समर्पित आहे, ताई तू सुखी व्हावीस हीच माझी इच्छा आहे", असा मजकूर या पत्रात आहे. "किती करतेस तू कुटुंबासाठी ... तुझे आरोग्य, शिक्षण, रोजगार, स्वयंरोजगार यांना बळ देण्यासाठी तुझा हा भाऊ तुझ्या पाठीशी सदैव उभा राहील अशी ग्वाही देतो." अशी भावनिक साद घालण्यात आली आहे. "त्या बदल्यात मला काय हवंय? काही नको. तुझा कष्टाळू कर्तबगार हात माझ्या डोक्यावर असू दे सदैव." असे त्यात लिहिले आहे.