राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी दोन दिवसांपूर्वी पत्रकार परिषद घेत अजित पवार यांच्या बारामती विमान दुर्घटनेवरुन अनेक सवाल उपस्थित केले. तसेच, अजित दादांचा मृत्यू हे अपघाती निधन असण्यापेक्षा घातपात असल्याचा संशयही त्यांनी व्यक्त केला. नरेश अरोरांच्या शेकडो कोटींच्या कंत्राटावरून अजितदादा, प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांच्यात वाद झाला होता, असा खळबळजनक आरोप आमदार रोहित पवार यांनी केला आहे. नरेश अरोरांचे कंत्राट रद्द करण्यावरून हा वाद झाला होता असे रोहित पवार म्हणाले.
आम्ही पुण्यात बारामती हॅास्टेलला बसलो होतो, तेंव्हा नरेश अरोराच्या लोकांना दादांनी झापले होते. नरेश अरोराचं कंत्राट कायम ठेवून त्याला तेवढे पैसे द्यायला पाहीजे होते, असा काही नेत्यांचा आग्रह होता. कदाचित ते तटकरे असावेत असा अंदाज आहे, असे म्हणत रोहित पवारांनी नरेश अरोराच्या कंत्राटवरुन सुनिल तटकरेंकडे कंत्राटवरुन बोट दाखवले आहे.
तसंच, 'प्रमोद हिंदूराव हे दादांच्या जवळचे पदाधिकारी आहेत. त्यांनी स्वत:हून सांगितले की, प्रफुल्ल पटेल यांचा फोन आला होता. त्यांची कुठली तरी फाईल तिथे होती. फाईल आणण्यात आणि सही करण्यात वेळ गेला. म्हणून दादा कारने जाणार होते. त्यांना कारने न जाता विमानाने जावे लागले. त्यांची लोकं देखील बोलायला लागले आहेत. त्यामुळे दादांच्या बाजूने आज कुणीतरी बोलतेय हे बघून आनंद झाला. गेल्या ४ महिन्यांमध्ये दादा एकटे पडल्यासारखे आम्हाला वाटत होते. काही ठराविक आमदार आणि काही पदाधिकारी हे मात्र दादांच्या बाजूने बोलताना आपण बघत होतो. पण काही पदाधिकारी मोठ्या लेव्हलचे, देशपातळीवरचे, राज्य पातळीवरचे हे दादांच्या बाजूने बोलत नव्हते आणि दादांसोबत प्रचाराला फिरत नव्हते.', असे रोहित पवारांनी सांगितले.