अजित पवारांच्या विमान अपघाताला आज एक महिना पूर्ण झाला. २८ जानेवारी रोजी विमान अपघातात त्यांचा मृत्यू झाला. या अपघातानंतर अनेकांकडून हा अपघात नसून घातपात असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. अद्याप तपासात कुठल्याही निष्कर्षापर्यंत पोहचता आले नाही. इतके प्रबळ मुद्दे, पुरावे आहेत अजूनही लोकांना अपघातासाठी दिलेले हवामानाचे कारण पटत नाही. हा विमान अपघात सूनियोजितपणे घडवून आणला असावा त्यामुळे सीबीआयकडे हे प्रकरण सोपवले आहे. विमान रडारवरून अचानक गायब झाले, लँडिंग गिअरसोबतही छेडछाड झाल्याची शक्यता नाकारता येत नाही त्यामुळे शंकेला वाव आहे. इंधनात काही घटक असे समाविष्ट केले होते का ज्याने हवेत असताना इंजिन बंद पडले हादेखील वादाचा मुद्दा आहे. या विमानातील पायलट सुमित कपूर जिवंत असल्याचीही माहिती येतेय यासारखे खळबळजनक दावे आमदार अमोल मिटकरी यांनी केले आहेत.
विधिमंडळात पत्रकारांशी संवाद साधताना मिटकरी यांनी अजितदादांच्या विमान अपघातावर मोठे दावे केले. अमोल मिटकरी म्हणाले की, अपघाताच्या काही तास आधी बारामती धावपट्टीवर आणि हँगर ठिकाणी काही व्यक्ती दिसल्याचे सीसीटीव्हीत कैद झाले आहे. जे विमानतळाचे कर्मचारी नव्हते. त्यांना कुणाच्या सांगण्यावरून तिथे प्रवेश मिळाला याचा तपास राज्य सीआयडी करत आहे.
एका महिन्यात ब्लॅक बॉक्स मिळाला. तो जळालेल्या अवस्थेत होता. त्यानंतर तो सुरक्षित असल्याचे सांगितले. अद्यापही या अपघातातील पायलट जिवंत असल्याचं कळतंय. सुमित कपूर कॅलिफोर्नियात असल्याची माहिती आहे. सुमित कपूर जर जिवंत असतील तर याचा अर्थ DGCA ने आधी ६ माणसे विमानात होती सांगितले, त्यानंतर ५ जणांचा मृतदेह सापडला असं सांगितले. याचा अर्थ त्या विमानात सुमित कपूर नव्हता. शांभवी पाठक विमान चालवत होती का..? असा प्रश्नही मिटकरींनी उपस्थित केला.
तसेच DGCA च्या अहवालात अजिबात काही उत्तरे मिळणार नाहीत. डीजीसीएकडून VSR कंपनी आणि त्यांच्या विमानावर ताशेरे ओढले आहेत. मग DGCA वर एफआयआर नोंदवून घेताना इतका संघर्ष करावा लागत आहे. शेवटपर्यंत पोलिसांनी हा एफआयर नोंदवून घेतला नाही. मग हाती काय येणार आहे?, माझ्या विवेकबुद्धीला जे पटते ते मी बोलतोय, मी जे बोलतोय ते चुकीचे नाही हे मला माहिती आहे. माझ्या प्रश्नांची उत्तरे मिळत नाहीत.अजितदादांसोबत काय घडले, अपघात झाला की घातपात झाला हे महाराष्ट्रासमोर आले पाहिजे अशी मागणी आमदार अमोल मिटकरींनी केली.